नवी मुंबई - केवळ सात हजार रुपयांसाठी ठेकेदारावर रॉड, चाकूने हल्ला ( Attack on contractor with rod knife ) झाल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील पुष्पक नगरमध्ये ( Knife attack in Pushpak Nagar in Panvel ) घडली आहे. शिवाजी राठोड असे गंभीर जखमी सिविल कॉन्ट्रॅक्टरचे नाव असून त्यांच्यावर कामोठे येथील MGM हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राठोड यांची सध्या मृत्यूशी झुंज सुरु असून या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात चार आरोपी कामगारांविरोधात भादंवि कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
रूममध्ये कोंडून केला हल्ला - पुष्पक नगर परिसरात एका टाकीचे काम सुरू आहे. हे काम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट राठोड यांना मिळाले होते. टाकीचे काम करणाऱ्या या कामगारांनी आपल्या मजुरीचे उरलेले 7 हजार रुपये राठोड यांच्याकडे मागितले. त्यावेळी राठोड यांनी पैसे देतो असे उत्तर दिले. मात्र, या गोष्टीला आठवडा उलटला तरी पैसे मिळाले नाहीत. याचाच राग मनात धरून चार आरोपी कामगारांनी सकाळी कामावर आल्यावर जवळच असलेल्या एका रूममध्ये राठोड यांना बोलावून रॉड, चाकूने हल्ला केला. यावेळी राठोड यांना दोरीने बांधत जबर मारहाण करण्यात आली.
पैसे मोबाईल लंपास - आरोपींनी एवढ्यावरच न थांबता राठोड यांच्याकडील पैसे मोबाईल लंपास करत पोबारा केला. या जीवघेण्या हल्ल्यातून राठोड बचावले खरे, पण अजूनही त्यांच्यावर कामोठे MGM हॉस्पिटलला उपचार सुरु आहेत. त्यांना अनेक ठिकाणी फ्रॅक्चर,जबर जखमा झाल्या. चारही आरोपी बिहारचे असून ते फरार आहेत. केवळ सात हजार रुपयांसाठी या कामगार आरोपींनी ठेकेदारावर केलेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे पनवेल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.