मुंबई - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी किरीट सोमय्याही तेथे उपस्थित होते. मात्र, ते दोनच मिनिटात तेथून निघून गेले. त्यामुळे सोमय्यांचा ईशान्य मुंबई मतदार संघातून पत्ता कट झाल्यानंतर, आता त्यांच्या बोलण्यावरही निर्बंध घालण्यात आले नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पत्रकारांनी हुसैन यांना भाजपने सोमैय्यांना उमेदवारी का? दिली नाही, याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी कोणत्याही घटक पक्षाच्या दबावाने ही उमेदवारी नाकारण्यात आली नाही. उमेदवारी देण्याचा निर्णय केंद्रीय निवड समिती घेते. या समितीच्या विचारानेच सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिल्याचे त्यांनी सांगितले. सोमय्या हे पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या अनुभवाचा लाभ पक्षाला होणार आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पदावर बसवण्यासाठी देशभरातील कार्यकर्ते काम करत आहेत. त्यात जेष्ठ नेतेही असल्याचा उल्लेख करत त्यांनी मुख्य प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी हुसैन यांचे उत्तर पूर्णहोण्यापूर्वीच सोमैय्या मंचावरून खाली उतरले. याबाबत सारवासारव करत लगेचच हुसैन यांनी त्यांना प्रचाराला जायचे असल्याचे सांगितले. तसेच ईशान्य मुंबईत सोमय्या जोरदार प्रचार करून मनोज कोटक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील, असेही ते म्हणाले.