मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी आता मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. एनआयएने तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली. यानंतर भाजप नेते किरीट सोमैया यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची देखील हकालपट्टी झालीच पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केली आहे.
सचिन वाझेंना अटक झाली. पण, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही जाब विचारला पाहिजे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते 'ओसामा' सचिन वाझेंना वाचवण्यासाठी आणखी काय सांगणार आहेत ते पाहिले पाहिजे. तपासात आणखी काय-काय बाहेर येणार? तेही पाहायला हवे, असे किरीट सोमैया यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
काय आहे प्रकरण -
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक सापडल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता. या पथकामध्ये सचिन वाझे यांचादेखील समावेश होता. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य साक्षीदार मनसुख हिरेन यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने या घटनेला गंभीर वळण लागले. यावेळी विरोधी पक्षाने वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एनआयएने वाझेंना अटक केली. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. आज(रविवार) सचिन वाझे यांना एनआयए कोर्टात हजर करणार आहे. त्यांनी काल अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला.