मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांच्यानंतर प्रदीप शर्माही तुरुंगात जाणार असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर व कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला असून त्यांना अटक केली आहे. हिरेन यांची हत्या करण्यासाठी मंत्री अनिल परब यांच्या पार्टनरने त्यांची गाडी दिली होती. ही सर्व उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेची कमाल आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमैया यांनी दिली.
यापूर्वी या प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. पण, आता थेट छापा टाकून एनआयएनने झाडाझडती सुरू केली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर फेब्रुवारी महिन्यात जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक चारचाकी मोटार सोडण्यात आली होती. त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. प्रदीप शर्मा हे सचिन वाझे यांच्या जवळचे समजले जातात. यानंतर प्रदीप शर्मा यांचीही एनआयएने एप्रिल महिन्यात चौकशी केली होती. काही महिने हे चौकशी थांबली होती. पण, आज (दि. 17 जून) सकाळी एनआयएने प्रदिप शर्मा यांच्या घरावर व कंपनीवर छापा टाकून त्यांची चौकशी करुन अटक केली आहे.
या पूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते सचिन वाझे जेलमध्ये गेले. आता शिवसेनेचे उपनेते आणि आमदारकीचे उमेदवार प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार आहेत. यानंतर अनिल परब यांच्यापर्यंत तपास यंत्रणा पोहोचल्यावर मला आश्चर्य वाटणार नाही. ही उद्धव ठाकरेंची माफियासेना आहे, अशी टीका किरीट सोमैया यांनी दिली.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण; प्रदीप शर्मांना एनआयएकडून अटक