मुंबई - लोअर परळ येथील गोमाता नगर मध्ये चार गाळे माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी हडपल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. या जागा झोपू ताब्यात घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र, भाडेतत्त्वावर राहत असलेल्या जागेवरून सोमय्या राजकारण करत आहेत. भाडे तत्त्वावरील घर मालकाने जागा सोडल्यानंतर झोपू तिचा ताब्यात घेते. मात्र, सोमय्या त्यावरही कांगावा करत आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
राजकीय सूडबुद्धीने आरोप - ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपू योजनेचे चार गाळे बळकावल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेतून केला. बनावट कागदपत्रे तयार केल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे. लवकरच झोपु ताब्यात घेईल, तसा अहवाल प्राप्त झाला आहे. गोमाता नगर मधील रहिवाशांनी हे आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. सोमय्या नेहमीच आरोप करत असतात. आताही माहिती न घेता, राजकीय सूडबुद्धीने आरोप केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
जागेवरून कांगावा करायची गरज काय? - किशोरी पेडणेकर गेल्या कित्येक वर्षांपासून ६०१ या गाळ्यात भाडेतत्वावर राहत होत्या. महापौर झाल्यानंतर त्या महापौर बंगल्यात वास्तव्यास गेल्या. भाडे तत्त्वावरील जागा सोडल्यानंतर तिचा ताबा झोपु प्राधिकरण घेते. ही प्रक्रिया आताची नाही. त्यानुसार किशोरी पेडणेकर राहत असलेला गाळा झोपु ताब्यात घेणार आहे. मुळात जी जागा त्यांची स्वतःची नाही, त्या जागेवरून कांगावा करायची गरज काय? असा सवाल स्थानिक रहिवासी उपस्थित करत आहेत. २००५ नंतर पेडणेकर येथे भाडेतत्त्वावर राहण्यास आल्या होत्या. त्याची कागदपत्रे मूळ मालकाच्या नावाने आहेत. त्यांच्या नावावर गाळा होऊ शकत नाही. किरीट सोमय्या पूर्वी 10 गाळे बोलत होते. आता चार म्हणत आहेत. मात्र, तसे काही नाही अशी माहिती स्थानिक रहिवासी साईनाथ मोरे यांनी दिली.