मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या हे कथित व्हिडिओ क्लिपनंतर काहीसे शांत झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा ते नव्या पुराव्यांसह समोर आले आहेत.
10 कोटींचा तत्कालीन ठाकरे सरकारवर आरोप : मुलुंड येथील रिचर्डसन कृडास कंपनीची जमीन कोविड काळात हॉस्पिटल उभारण्यासाठी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. त्यासाठी सिडकोला हॉस्पिटल उभारण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले. ओक्स मॅनेजमेंट या कंपनीला कंत्राट देण्यात आले. या कन्सल्टन्सी कंपनीसोबत सिडकोने या ठिकाणी 1 हजार 850 खाटांचे तात्पुरते हॉस्पिटल उभारले. हे हॉस्पिटल उभारण्यासाठी सुमारे 10 कोटी 94 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
हॉस्पिटलच्या भाड्यापोटी 100 कोटी : 11 कोटी रुपयांमध्ये उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलसाठी दरमहा तीन कोटी 69 लाख रुपये भाडे ओक्स मॅनेजमेंट या कंपनीला देण्यात येत होते. असे सुमारे 25 महिने या कंपनीला भाडे देण्यात आले. यासाठी एकूण 100 कोटी रुपये खर्च झाले. वास्तविक ओक्स मॅनेजमेंट कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. या कंपनीला या क्षेत्रातील कोणताही अनुभव नव्हता. केवळ उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने कंपनीला कंत्राट देण्यात आले. 2007 ते 2020 या काळात या कंपनीची एकूण उलाढाल शंभर कोटी पेक्षाही कमी आहे. तरीसुद्धा या कंपनीला सुमारे सातशे कोटी रुपये दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
चौकशी होणारच : या संदर्भात, केवळ या एका केंद्रातच शेकडो कोटींचा घोटाळा झाला नाही, तर अशा 15 केंद्रांमध्ये घोटाळा झाला आहे. काहीही झाले तरी, या सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.
हेही वाचा -