नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. देशातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आणि हे नाते आता आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असे केजरीवाल यांनी भेटीनंतर सांगितले. भेटीनंतर मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे शेर: निवडणूक आयोगाच्या निकालावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे चिन्ह आणि नाव चोरीला गेले आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते. आणि उद्धव ठाकरे हे त्यांचे पुत्र आहेत. म्हणून शेर का बेटा शेर होता असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना शेर म्हणून संबोधले आहे. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय मिळवून देईल असेही ते म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंचे केले कौतुक: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मातोश्री येथे पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगले काम केले. आणि आम्ही कोरोना काळात महाराष्ट्राकडून अनेक गोष्टी देखील शिकलो.
देशात अनेक समस्या: मुख्यमंत्री केजरीवाल यांना निवडणूकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, देशात अनेक सारे प्रश्न असताना देखील भाजप कायम निवडणूकीचा विचार करत असते. आम आदमी पक्ष हा देशातील बेरोजगार तरूणांचा, गृहणींचा आणि शेतकऱ्यांचा समस्याचा विचार करत असतो. म्हणून ज्यावेळी निवडणूका येतील तेव्हा निवडणूकांचा विचार करू असेही ते म्हणाले आहेत.
भाजपची गुंडागर्दी: भारतीय जनता पक्षावर टीका करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, गुंडीगर्दी करण्याशिवाय भाजपला काहीच काम येत नाही. आम्ही आपल्यातच का लढत आहोत, असा प्रश्न सध्या मला पडत आहे. दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणूकीत आम्हाला बहुमत मिळून देखील आमचा महापौर भाजप बनू देत नव्हते, परिणामी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. आणि शेवटी आमचाच महापौर नियुक्त झाला.
आपला देश सर्वोत्तम: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, देश कशापद्धतीने प्रगती करू शकतो, याकडे राजकीय पक्षांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आज देशात अनेक समस्या असताना या देशातून अनेक उद्योगपती पलायन करत आहेत. आमच्या देशात सर्व काही आहे आणि ते उत्तम आहे. पण चांगले लोक जर एकत्र झाले तर भारत हा जगातील सर्वोत्तम असेल, असा मला विश्वास आहे
भाजपला आमच्याविषयी भीती: आमच्यााविषयी भाजपला भीती आहे म्हणून ते देशाच्या राष्ट्रीय संस्थांचा वापर करत आहेत. पण त्यांचे हे कृत्य जनता बघत आहे. आणि शेवटी सत्याचाच विजय होतो, असे देखील मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.
केजरीवालांकडून भेटीसाठी दौरे: या महिन्यात उद्धव ठाकरेंच्या आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही भेट घेतली होती आणि काही दिवसांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन दिल्लीला गेले होते तेव्हा केजरीवाल त्यांना भेटायला गेले होते. तिथे दोघांमध्ये जे घडले त्याबाबत अद्याप काही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण काही शब्दांतून त्यांनी राजकारणात काहीतरी मोठे करण्याचे संकेत दिले.