मुंबई- धर्मनिरपेक्षता, अहिंसा, राष्ट्रीय एकात्मता आणि त्यासाठीच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, सभा, मेळावे आयोजित करून सामाजिक सौदार्ह वाढविण्यासाठी राज्यात मागील अनेक वर्षांपासून कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदा हा सप्ताह गुरुवारी, १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान, 'कौमी एकता सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे.
राज्यात अद्यापही कोरोनाचा धोका कायम असल्याने या सप्ताहनिमित्ताने आयोजित केले जाणारे सर्व कार्यक्रम ऑनलाइन आणि किंवा वेबिनार पध्दतीने घेतले जावेत, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींना सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
कौमी एकता या सप्ताच्या पहिल्या दिवशी गुरूवारी १९ नोव्हेंबर रोजी राज्यात विविध ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जाणार आहे. यामध्ये धर्मनिरपेक्षता, जातीयवाद विरोध व अहिंसा यावर भर देणाऱ्या सभा, चर्चासत्रे व परिसंवादाचे आयोजन केले जाणार असून हे सर्व कार्यक्रम ऑनलाइन किंवा वेबिनार पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी १५ कलमी कार्यक्रमावर भर देण्यात येणार असून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार यावर्षी मिरवणुका काढण्यात येवू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मंत्री मलिक यांनी दिली.
विविध प्रकारचे दिवसही होणार साजरे
या सप्ताहातील पुढील दिवसांमध्ये भाषिक सुसंवाद दिवस, दुर्बल घटक दिवस तसेच २० कलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीमधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्यादृष्टीने ऑनलाइन किंवा वेबिनार पध्दतीने कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच सांस्कृतिक एकता दिवस, महिला दिन, जोपासना दिवस आदी दिवसही साजरे करून त्या-त्या दिवशी संबंधित विषयांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही अल्पसंख्यांक मंत्र्यांनी दिली.