मुंबई - बालभारतीच्या मराठी कवितांचा रंगमंचीय अविष्कार "कट्टी बट्टी" या नावाने गंधार या संस्थेने साकारला आहे. आज शुभारंभाच्या प्रयोगात 30 बच्चे कंपनीने सादर केलेल्या हाउसफुल परफॉर्मन्सने शिवाजीमंदिरचे सभाग्रह दणाणून सोडले. या "कट्टी बट्टी ने सगळ्यांचे सुट्टी केली" अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी या बच्चे कंपनीचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर स्वतः कडून वैयक्तिक 1 लाख 1 हजार रूपयांचे बक्षीस संस्थेला जाहीर केले.
मराठी बालभारतीचे पुस्तक दप्तरात दुमडून पडू नये, त्यातील कवितेचा आस्वाद कवी मनाने बालमनाला घेता यावा, याकरीता हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, म्हणून ठाण्यातील गंधार या संस्थेने 'कट्टी-बट्टी' हा रंगमंचीय नृत्यनाट्य आणि काव्यवाचनाचा अविष्कार साकारला आहे. या रंगमंचीय आविष्काराचे दिग्दर्शन प्रा. मंदार टील्लू यांनी केले आहे. आज शुभारंभाचा प्रयोग शिवाजी रंग मंदिर, दादर येथे मोठ्या गर्दीत आणि शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड आशिष शेलार यांच्यासह आ. संजय केळकर, अशोक हांडे, विजय गोखले आणि अशोक पत्की यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
शिक्षणमंत्र्यांनी बच्चे कंपनीने सादर केलेल्या या अविष्काराचे कौतुक करत 1 लाख 1 हजार रुपयांचे वैयक्तिक बक्षिस जाहीर केले. तर गंधार संस्थेने या उपक्रमातून खर्च वजा जाता उरलेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे जाहीर केले. तर या प्रयोगातून 51 हजार रुपये पुरग्रस्तांसाठी देण्यात येईल, असे गंधारतर्फे प्रा. मंदार टील्लू यांनी जाहीर केले.
अशोक हांडे म्हणाले, मुलांना काही शिकवू म्हणून आलो आणि मीच बरेच काही शिकून जात आहे. तर अशोक पत्की यांनी हा नितांत देखणा अविष्कार असल्याचे सांगत बालकलाकरांचे कौतुक केले. विजय गोखले म्हणाले की, या कार्यक्रम म्हणजे कवितेचा आनंदी नजराणा असून त्याची संहिता संग्रह्य ठेवावी अशी आहे. कार्यक्रमाला नाटककार प्रा. प्रदीप ढवळ, कामगार नेते मिलिंद तुळसकर, नगरसेविका राजेश्री शिरवडकर, राजेश शिरवडकर आदी उपस्थित होते.
पहिली ते नववीतील 30 मुलांच्या चमूने हा अविष्कार अत्यंत देखण्या स्वरुपात आणि रसिकांच्या मनाशी थेट संवाद साधत सादर केला आहे. कधी मंगेश पाडगावकरांची बडबड गीते तर कधी ज. वि. पवरांची मुकनायक, कधी शांता शेळके यांचे टपटप टाकीत टापा चाले माझा घोडा तर कधी राजा बडे यांचे महाराष्ट्र गीत, कधी विठ्ठल वाघ यांची काळ्या मातीत चालणारी तिफण, नारायण सुर्वे यांची भाकरीचा चंद्र तर कधी बलसागर भारत होवो चा निश्चिय ! अशा एकापेक्षा एक कविता सादर गाऊन तर कधी नृत्यातून सादर करुन लहान मुलांनी धम्माल उडवून दिली.
रसिकांच्या उपस्थितीसह सादरीकरणही हाऊस फुल्ल झाला. आपले संवेदनशील एक मित्र जेव्हा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री होतात, तेव्हा त्यांना एखादी संवेदनशील भेट द्यावी असे वाटत असताना ही संकल्पना सूचली, असे या नाट्य आविष्काराचे लेखन संकल्पना करणारे पत्रकार प्रशांत डिंगणकर यांनी सांगितले.