मुंबई - शुक्रवारी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युतीची जाहीर सभा झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होताच कार्यकर्त्यांनी काढता पाय घेत मैदानातून एक्झीट मारली.
हेही वाचा - मी जोपर्यंत आहे तोपर्यंत संविधानाला हात लाऊ देणार नाही - रामदास आठवले
या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकच उरले नसल्याच्या टीकेचा पुनरुच्चार केला. त्यासोबतच त्यांनी ईडीचा वापर, सुशीलकुमार शिंदेंचे काँग्रेस-राष्ट्रवादी थकल्याचे वक्तव्य अशा मुद्द्यांवर देखील टीका केली. मात्र, एकीकडे स्टेजवर हे सगळे घडत असताना दुसरीकडे समोर बसलेल्या कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मात्र वेगळेच काहीतरी घडले. भाषणांमध्ये सर्वात आधी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि सर्वात शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले.
हेही वाचा - 'काँग्रेस जिंकण्यासाठी नाही तर अस्तित्वासाठी निवडणुकीच्या रिंगणात'
कधीकाळी मोदींच्या भाषणासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, आज उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर लगेचच अनेकांनी घरचा रस्ता पकडल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता, असे समजत आहे.
हेही वाचा - मी पहिल्याच दिवशी सेनेचा राजीनामा दिला - तृप्ती सावंत
उद्धव ठाकरेंचे भाषण होताच समोर बसलेल्या अनेक मुंबईकरांनी सभेमधून काढता पाय घेतला. सभास्थानावरून बाहेर पडलेल्या मुंबईकरांची गेटवर गर्दी दिसत होती आणि आत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत होते असे चित्र दिसत होते. लोकसभा निवडणुकांवेळी देखील नरेंद्र मोदींचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मोदी भाषण करत असताना मैदानाच्या मागच्या बाजूने लोकं निघून जात होते. आता पुन्हा एकदा मुंबईच्या बीकेसीमध्ये तसा प्रकार दिसून आला आहे.