मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगणा रानौत यांच्यात वाद सुरू आहे. या दरम्यान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी खार येथे पावणे चार कोटींचे कार्यालय खरेदी केले आहे. मात्र, या व्यवहाराचा शिवसेना प्रवेशाशी किंवा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही, असे उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केले आहे. मी या सर्व व्यवहाराचे कागदपत्रे द्यायला तयार आहे. त्याबदल्यात कंगनाने ड्रग्ज घेणाऱ्यांची यादी एनसीबीला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दुर्गा चेंबर्समध्ये घेतले कार्यालय -
खार पश्चिमेकडील 'दुर्गा चेंबर्स' इमारतीत उर्मिला यांनी हे कार्यालय घेतले आहे. दुर्गा चेंबर्स ही सात मजल्याची इमारत आहे. इमारतीचा दर्शनी भाग काचेचा आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील कार्यालयांचे भाडे महिन्याला ५ ते ८ लाख एवढे आहे. या इमारतीचा तळमजला हा व्यावसायिक वापरासाठी आहे. उर्मिला यांनी या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कार्यालय खरेदी केले असून ते सुमारे १०४० चौरस फुटांचे आहे. या जागेचा दर ३६ हजार प्रति चौरस फूट असल्याचे समजते. राजेश कुमार शर्मा या उद्योजकाकडून उर्मिला यांनी हे कार्यालय खरेदी केले असून २८ डिसेंबरला हा व्यवहार झाला आहे.
हेही वाचा - ..तर २६ जानेवारीला दिल्लीमध्ये 'ट्रॅक्टर परेड' होईल; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा इशारा