नवी मुंबई - लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविल्यामुळे चोरून गावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या अवैधरितीने गावी जाणाऱ्या लोकांवर अंकुश राहावा, त्यांना वेळेत प्रतिबंध करता यावा, म्हणून वाहतूक विभागातर्फे कळंबोली येथे वॉच टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवल्याने आता पुन्हा एकदा नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.
यावर प्रतिबंध घालण्यासाठी वाहतूक विभागातर्फे कळंबोली येथे वॉच टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. कळंबोली येथूनच मुंबई पूणे एक्सप्रेस वे ची सुरवात होते. तसेच मुंबई गोवा महामार्ग देखील येथून काही अंतरावर आहे. याठिकाणावरून फक्त जीवनावश्यक व अतिमहत्वाच्या कामासाठी जाणाऱ्या गाड्यांनाच जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. अशात काही नागरिक छुप्या पद्धतीने अनधिकृत प्रवासी वाहतूक देखील करतात. यावर आळा बसावा व ही अनधिकृत वाहतूक रोखता यावी, यासाठी या वॉच टॉवरची उभारणी करण्यात आली असून यामुळे अशा वाहन चालकांवर कारवाई करणे अधिक सुकर होणार आहे.