मुंबई : लालबाग मार्केट समोर असलेल्या पेरू कंपाऊंड येथे एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी गेल्या आठवड्यात एका अज्ञात इसमाने बतावणी करून चोरी केली होती. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळातील सीसीटीव्ही तपासून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर कल्याण येथील आंबिवली परिसरात आरोपीला पोलिसांनी पकडले.
आरोपीच्या मुसक्या आवळल्या : पोलिसांनी आंबिवली येथील इराणी वस्तीतून आरोपीला अटक करीत फिल्मी स्टाईलने फरफटत मुंबईत आणले आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पथकाने आपल्या जीवाची बाजी लावून या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीचे नाव काबुल जाफरी उर्फ काबुल नवशाद अली (वय - 60) असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
32 हून अधिक गुन्हे : कल्याण येथील आंबिवली परिसर हा अट्टल गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जातो. जेव्हा-जेव्हा येथे आरोपीला पकडायला पोलीस जातात तेव्हा-तेव्हा पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला जातो. मात्र, तरीदेखील जीवाची बाजी लावून जिगरबाजपणे काळाचौकी पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबईसह महाराष्ट्रात 32 हून अधिक गुन्हे असणाऱ्या अट्टल आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हात चलाकी करून मंगळसूत्र चोरले : पेरू चाळ येथील जयश्री शंकर काळेकर (78) या लालबाग मार्केटकडे जात असताना पोलिस असल्याची बतावणी करून दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खिशात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी हात चलाकी करून मंगळसूत्र काढून महिलेची फसवणूक केली. ही घटना 4 जुलै रोजी सकाळी 11.35 च्या सुमारास घडली. याप्रकरणी जयश्री काळेकर यांनी काळाचौकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीच्या आधारे काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 420, 170 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीवर चार दिवस नजर : या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाणांसह त्यांचे गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी रवाना झाले. संशयिताची माहिती मिळविण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. खबर्याने दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीत दिसणारा संशयित आरोपी आंबिवली येथील असल्याचे निश्चित झाले. त्यांनतर उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्यासह त्यांचे सात जणांचे पथक साध्या वेशातच आंबिवली येथे आरोपीवर चार दिवस नजर ठेवून होते.
'या' पथकाने केली कारवाई : काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मोरे आणि पोलीस शिपाई स्वप्निल पाटील, गोपाळ चव्हाण, मुबारक सय्यद, वळवी आणि पराग शिंदे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.