मुंबई - मुंबईकर आतुरतेने वाट पाहतात त्या काळाघोडा फेस्टीवलला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. विविध कलाकृती तसेच सामाजिक घडामोडींवर परखड भाष्य मांडणार शिल्प या महोत्सवाचे खास आकर्षण ठरत आहे. तरुणाईने या महोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तसेच येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव कला रसिकांसाठी खुला राहणार आहे.
काळाघोडा फेस्टीवल हा भारतातील सर्वात जुना आणि मुंबईतील सर्वात मोठा स्ट्रीट फेस्टीवल म्हणून ओळखला जातो. तसेच हा फेस्टीवल कला, सिनेमासाठी ओळखला जातो. या महोत्सवाचे यंदा २१ वे वर्ष असून तरुणाईने मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यांच्यासह परदेशी नागरिक देखील हा फेस्टीवल पाहण्यासाठी येत असतात. यामध्ये राज्यातील पारंपरिक वेशभूषा, विविध पदार्थ, क्राफ्ट, सिनेमा, नाट्य, संगीत यांसारख्या कला आणि कलाकृतींचाही मुंबईकर आनंद घेत आहेत. तसेच महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत विविध कलाकृतीच्या माध्यमातून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे.
जुन्या भारतीय आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला आहे. यामध्ये जुना टपाल, खादीचे कापड, टाकाऊपासून टिकाऊ कलाकृती साकारण्यात आलेले आहे. यामध्ये यंदा लाल रंगाची फियाट कार ठेवण्यात आली आहे. त्या कारला खादी व जीन्सच्या कपड्याने सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहे.
काळा घोडा फेस्टिवल बद्दल जाणून घ्या -
काळाघोडा महोत्सवाची सुरुवात 1999 मध्ये करण्यात आली. हा महोत्सव मुंबईच्या काळाघोडा परिसरातील स्ट्रीटवर वीस वर्षांपासून भरवण्यात येत आहे. याला देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून ओळखले जाते. येथे देशातून अनेक कलाकार येऊन आपली कला सादर करतात, तर नवोदित कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन आणि खुले व्यासपीठ देण्यात येते. यामध्ये सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य, संगीत यासह विविध राज्यातील स्टॉल्स तसेच कलाकृती पाहायला मिळतात.