मुंबई - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी भ्याड हल्ला झाला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या आइशी घोष हिच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या विरोधात सोमवारी राज्यातील विविध विद्यार्थी संघटनांनी सोबतच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी हुतात्मा चौकात केंद्र सरकार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीव्र निषेध केला.
यावेळी सुवर्णा साळवे या आंदोलनकर्त्या म्हणाल्या, जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर जो हल्ला करण्यात आला तो भ्याड हल्ला होता. ज्या लोकांच्या इशाऱ्यावर हल्ला करण्यात आला, त्यांना आम्ही सत्तेतून पायउतार केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि त्यासाठीच आम्ही विद्यार्थी रस्त्यावर उतरले असल्याचे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - 'जेएनयू'मध्ये झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत - सम्यक विद्यार्थी संघटना
विविध संघटनांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. यामध्ये समता कला मंच, छात्रभारती, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, समतावादी विद्यार्थी संघटना, बहुजन क्रांती विद्यार्थी संघटना, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, अमन कमिटी आदी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात निषेध व्यक्त करणारे फलक लावण्यात आले. या फलकांवर निषेधाचे संदेश लिहिण्यात आले होते.