मुंबई - राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तुम्ही नेतृत्व करा, पक्षाला तुमची गरज असल्याचे आव्हाड म्हणाले. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राहुल गांधींना ही विनंती केली आहे.
राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षावर मोठे संकट आले असून, मला याचा त्रास होत असल्याचे आव्हाड म्हणाले. सुमारे ३५ वर्षापूर्वी मी माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून केली होती. आज मी महाराष्ट्रातील विधानसभेचा सदस्य आहे. आधीच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मी राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार येऊनही लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवरील माझा विश्वास अढळ राहिल्याचे आव्हाड म्हणाले.
सोनिया गांधी पक्षाला सुवर्णकाळ आणतील पण..
सोनिया गांधी वयोमान आणि प्रकृतीच्या कुरबुरी असूनही काँग्रेसचा सुवर्णकाळ परत आणू शकतील, यात तीळमात्र शंका नाही. मात्र, आपण एक संवेदनशील नेते आहात. सध्या उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला तुम्ही नेटाने तोंड देऊ शकता, असेही आव्हाड म्हणाले.
विचारसरणी मने जिंकेल..
काँग्रेसची विचारसरणी लोकांची मने नक्की जिंकेल. एखादे सैन्य पराभूत मानसिकतेने युद्ध कधीच जिंकू शकत नाही, असे इतिहास सांगत असल्याचेही आव्हाड म्हणाले. हा पक्षासाठी कठीण काळ आहे. आता आपल्या नेतृत्वाची परीक्षा आहे ती आपल्याला पास करावीच लागेल, असेही ते म्हणाले.
२०१७ मध्ये काँग्रेसने अध्यक्षपदाची माळ राहुल गांधींच्या गळ्यात टाकली. मात्र, लोकसभा निवडणुकीत पक्षाला आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी ३ जुलै २०९१ ला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.