मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशासह राज्यात अनेक ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत. या विधेयकाला जोरदार विरोध होताना दिसतोय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीटरवर एक कविता शेअर करत या विधेयकाला विरोध केला आहे. तसेच कवितेच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधारी भाजपवरही निशाणा साधला आहे.
या मातीत राख आहे आमच्या बा च्या बा ची
कुठून आणू कागद दाखवायला माझ्या ओळखीची असे म्हणत आव्हाड यांनी या देशावर सगळ्यांचा हक्क असल्याचे सांगितले आहे. ज्याचे ज्याचे या मातीत रक्त सांडले, त्याचा हा देश आहे. तसेच देशासाठी आमच्या बापजाद्यांनी गोळ्या झेलल्या आहेत. आज बी आम्ही गोळ्या झेलू, या मातीसाठी रक्ताची होळी कधी बी खेळू......असेही आव्हाडांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेली कविता
ह्या मातीत आहे राख आमच्या बा च्या बा ची
कुठून आणू कागद दाखवायला माझ्या ओळखीची
घर नाही दार नाही वणवण फिरले
आभाळाला छत आणि जमिनीला आधार म्हणून जगले
तेंव्हा कुणी बी हुसकवलं तर जमीन मोप होती
कारण ती थोडीशी माझ्या बा ची पण होती
कांबळ्याचा नाऱ्या
मोहल्ल्यातला शेरू
बकऱ्या चारणारा बाबू मित्रांचा गोतावळा
वाचता लिहिता पण येत नव्हते
पण नाते पक्के घट्ट होते
आता मातीची ओळख चालणार नाही म्हणतात
कागदाचे चिटोरे नाही म्हणून तुमचे मातीशी नाते काय विचारतात
अरे तुमचा बाप जेंव्हा शाळेत गेला
तेंव्हा माझा बाप रानात गेला
तुमच्याकडचे दोन वेळचे जेवण
आणि आमची एका भाकर तुकड्यासाठी वणवण
आता चिटोरे कुठून आणायचे
पूर्वी हाकलत होता गावातून
आता काय हाकलणार देशातून??
अरे भाड्यानो कुठे होते रे तुमचे बापजादे गोऱ्यांशी लढताना
लाज वाटत नव्हती त्यांची चाकरी करताना??
भुके अनवाणी लढले आमचे बाप
खाऊनी गोळ्या सांडले ह्या मातीत रक्त
ह्या मातीसाठी केले हे फक्त
ज्याचे ज्याचे रक्त सांडले ह्या मातीत
त्याचा हा देश आहे
तुम्हाला वाटतो तुमच्या बा चा आहे
पण तेवढाच तॊ माझ्या बा चा पण आहे
गांडूची औलाद नाही जे घाबरून जगू
तेंव्हा बी गोळ्या झेलल्या आज बी झेलू
ह्या मातीसाठी रक्ताची होळी कधी बी खेळू
अशा आशयाची कविता शेअर करत आव्हाड यांनी भाजप सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. हा देश तुमचा जितका आहे तितकाच आमचाही असल्याचे सांगितले आहे.