नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ते प्रचंड तणावाखाली असल्याचे बोलले जात होते. पोलीस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे, 'मी आरोपी नाही आहे, असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवत त्यांनी आपले जीवन संपवले. करमुसे प्रकरणात चौकशीसाठी वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील कावेसर भागात राहणारे अभियंता अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० रोजी ठाकरे सरकारमधील तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टीप्पणी केल्याच्या रागातून आव्हाड यांचे बॉडीगार्ड (पोलीस) आणि कार्यकर्त्यांनी करमुसे यांना घरातून उचलून आव्हाड यांच्या नाद बंगल्यावर नेत बेदम मारले होते.
मारहाणप्रकरणी आव्हाडाच्या पीएसह सहा कार्यकर्त्यांना अटक : याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आव्हाड यांच्या पीएसह सहा कार्यकर्त्यांना अटक केली होती. यातील तिघाही पोलिसांची विभागीय चौकशी झाली होती. मात्र, पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या बडग्याने तब्बल दीड वर्षानंतर दि.१४ ऑक्टो. २०२१ रोजी सायंकाळी वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांना छुटपुट अटक करून तत्काळ त्यांची जामिनावर मुक्तता केली होती. तर, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानेही पोलीस कॉन्स्टेबल सागर तुषार मोरे, पोलिस नाईक सुरेश आवाजी जनाठे आणि पोलीस हवालदार वैभव शिवाजी कदम यांच्याविरोधात कंटेप्ट ऑफ कोर्टचा ठपका ठेवला होता.
वैभव कदमांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप : दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीसाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश २४ फेब्रु. २०२३ रोजी दिले होते. याच प्रकरणाचा आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शवलेल्या वैभव कदम याने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. महत्त्वाचे म्हणजे करमुसे प्रकरणात कदम यांचीही आरोपी म्हणून चौकशी सुरू होती. दरम्यान, अनंत करमुसे प्रकरणात मोहित कंबोज यांनी धक्कादायक आरोप केला आहे. ही आत्महत्या नसून खून आहे, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आव्हाडांच्या अडचणी वाढणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपचारादरम्यान मृत्यू : बुधवारी सकाळी निळजे आणि तळोजा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान वैभव कदम हे जखमी अवस्थेत मिळाले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्याकडे कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही, असे ठाणे रेल्वे पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले.
कदम यांच्या डीपीवरील मॅसेज व्हायरल : कदम यांच्या आत्महत्येपूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दिवस वैभव कदम यांची चौकशी केली होती. त्यामुळे कदम तणावाखाली होते, असे त्यांचे निकटवर्तीय सांगत होते. आत्महत्येनंतर कदम यांच्या व्हाॅट्सअप डीपीवर 'साक्षी मला माफ कर, स्वर मला माफ कर, आई पप्पा मला माफ करा' मी खरंच चांगला नवरा, बाप, मुलगा होऊ शकलो नाही', मी डिप्रेशनमुळे हा निर्णय घेत आहे, यामध्ये कुणाचाही दोष नाही.
एका घटनेमुळे माझ्याची आयुष्य वाट लागली, पण त्यात कुणाचाही दोष नाही, स्वरा मला माफ कर, पोलीस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे मी आरोपी नाही, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जितेंद्र आव्हाड सिव्हील रुग्णालयात : कदम यांचा मृतदेह सिव्हिल रुग्णालयात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे स्वतः उपस्थित झाले. त्यांनी कदम यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत ही सर्व प्रक्रिया पार पाडली. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करीत असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याच्याबद्दल त्यांनी दुःखदेखील व्यक्त केले.