मुंबई - पत्रकाराला ड्रायव्हर म्हणणं म्हणजे आव्हाडांची बौद्धिक दिवाळखोरी असल्याचे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. त्याला रविवारी जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे. माझ्या बुद्धीचे जाउद्यात पण तुम्ही सदविवेक बुद्धीला स्मरून मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे 10 हजार कोटींचे आरोप केले त्याचे काय झाले ते सांगा असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी विखे पाटलांना प्रतिप्रश्न केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पत्रकार परिषदेत पत्रकारावर भडकले होते. त्यावरून सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलीय. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर ट्विट करत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरच टीका केली. त्या पत्रकाराचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतचा जुना व्हायरल झालेला फोटो ट्विट करत त्यांनी काही शेरेबाजीही केलीय. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. पत्रकारावर अशा प्रकारची शेरेबाजी करणं म्हणजे आव्हाडांची बैद्धिक दिवाळखोरीच आहे अशी टीका केली होती.