मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला विधानसभेसाठी लवकरात लवकर प्रस्ताव द्यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. समविचारी पक्षांनी एकत्र यावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही आव्हाड म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीला वेग आला आहे. काँग्रेसने वंचितला आमची दारे तुमच्यासाठी खुली आहेत, असं म्हटले आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही वंचित बहुजन आघाडीला तातडीने जागांचा प्रस्ताव द्यावा, अशी विनंती काँग्रेस-राष्ट्रवादीला केली आहे. समविचारी पक्षांमधले मतविभाजन टाळता यावे, यासाठी आघाडीने वंचितला शक्य होईल तितक्या लवकर प्रस्ताव द्या, असेही आव्हाड म्हणाले.
मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जागांचा आकडा कायम राखला आहे. मात्र, कॉंग्रेसने एक जागा गमावली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस चार; तर कॉंग्रेस अवघ्या एका जागेवर निवडून आली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने दोन्ही कॉंग्रेसच्या आठ ते दहा जागा पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाव वधारलेल्या "वंचित'ला आघाडीत कसे सामावून घेतले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. विधानसभेसाठी आघाडी करावयाची असल्यास समसमान पातळीवर करावी, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले होते.