मुंबई: मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री Chief Minister and Deputy Chief Ministe या दोघांचे दिल्लीतले नेते सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यालयात माध्यमांशी बोलताना केली आहे.
पुण्यात पावसाने वाताहत: पुण्यात प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला. तर दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. मराठवाड्यातील सहा जिल्हयात पावसाने अतिशय गंभीर परिस्थिती केली आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने बळीराजाच्या पाठीशी तातडीने उभे राहून त्यांची दिवाळी समाधानाने जाईल याची व्यवस्था करावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.
पैश्याचे नियोजन न करताच घोषणा : सरकारने शिधा वाटपाची घोषणा उत्साहात केली. सरकार आपली प्रतिमा सुधारण्याच्या गडबडीत आहे. त्यातून घोषणा केली. मात्र पैशांची जुळणी झालेली नाही, असा आरोप करतानाच जुळणी झाली तर किमान दिवाळीच्या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे वागावे, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. मात्र सरकारने दिवाळी गोड करणार, अशी घोषणा करुन पैशांची तजवीज केली नाही. यातून सरकारची अकार्यक्षमता लक्षात येते, असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला आहे.
सरकारमध्ये काही आलबेल नाही : उध्दव ठाकरे यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे, असा उद्योग काही लोक करत आहेत. मात्र त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी, उध्दव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत. पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे. हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.
शास्त्रीय चौकशी आवश्यक : पाऊस पडणे हे कुणाच्याच हातात नाही. पण पडलेल्या पावसाचे पाणी ताबडतोब घालविण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे होती. त्यात पूणे महानगरपालिका कमी पडली असा थेट आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या सुविधा, व्यवस्था, नदीपात्रातून जाणारा पाण्याचा वेग या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा मागच्या 5 वर्षात करता आली असती. परंतु ती केली नसल्याने पुण्यातील जनतेवर संकट ओढावले. पाऊस पडण्याचे नियंत्रण पालिकेकडे नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु संकट पुणे शहरावर आले गाडया वाहून गेल्या आहेत. जर नालेसफाई व इतर गोष्टींकडे लक्ष दिले असते.
तर चांगलं चित्र दिसले असते : स्मार्टसिटी कार्यक्रम राबवला त्यातून कामे केली असती तर चांगलं चित्र दिसले असते. त्यामुळे पुणे महानगरपालिकेत आलेल्या संकटाची शास्त्रीय चौकशी करणे आवश्यक आहे. अशी मागणी करतानाच असा पाऊस आला की, पूर येतो. मात्र आपण पहातो व विषय सोडून देतो. परंतु पुणे हे देशातील मुंबईनंतर दहाव्या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे अशा गुंतवणुकीसाठी योग्य असलेल्या शहरात असे होणे कमीपणाचे आहे. नागरी असुविधा होत असतील, तर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असा टोला जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.