मुंबई -"विठामाय गुरु केली म्यातं ज्ञानाची पाहून,
मला शिकविला ज्ञान मांडी जवळ घेऊन व धुरपतामाय..."
हे लोकगीत म्हटले आहे, चंद्रपूरच्या महाकाली म्हणजेच धुरपतामायच्या परंपरेला वाहून घेतलेल्या गुरु विठामाय यांच्या शिष्या जलसामाय कदम यांनी. आपल्या गुरु विठामायवर अशी हजारो गाणी त्या गातात. ठेका धरायला लावणारी त्यांची ही गाणी मौखिक परंपरेतील आहेत. या गाण्यांचे बोल, चाल ही काळजाला जाऊन भिडणारी आहे. ही गाणी आणि लाखो जणांचा मेळा जमवणारे हे गुरु - शिष्य अजूनही दुर्लक्षित राहिले आहेत.
अनेक वर्षांपासून आपल्या गुरूची आठवण करण्यासाठी जलसामायसारखे असंख्य शिष्य हे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तिची अशी गाणी गाऊन आठवणींना उजाळा देतात आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्या गुरु विठामायच्या समाधीवर जाऊन डोके टेकवत असतात.
परभणीपासून गंगाखेड रोडवर २७ किलोमीटर अंतरावर दैठणा नावाचे गाव आहे. याच दैठण्यात विठामाय यांची गावाच्या बाहेर समाधी आहे. ही देवकरीन तीन दशकापूर्वी होऊन गेल्याचे सांगितले जाते.
देवकरीन म्हणजे काय
देवकरीन म्हणजे चंद्रपूर येथील महाकालीच्या परंपरेला वाहून घेतलेली एखादी योगिनीच. महाराष्ट्रात अशा अनेक देवकरीन झाल्या असल्या तरी विठामायची एक वेगळी ओळख आहे. जे समाजात उपेक्षित राहिले अशा सर्व महिला, पुरुषांना त्यांनी मातृपरंपरेचा वारसा चालवत त्यांना आत्मबोध, आत्मज्ञान दिले आहे. शेकडो शिष्यांना जातीधर्माच्या पलीकडे जाऊन हजारो वर्षाच्या मातृ परंपरेनुसार सावलीत आणून बसवले. त्यांना जगण्याची उमेद आणि सन्मान मिळवून दिला. त्यापैकीच एक विठामायच्या शिष्या जलसामाय आहेत. तेच ऋण जलासमय आणि त्यांच्यासारखे हजारो शिष्य गाण्यातून व्यक्त करत असतात.
जलसामाय कदम या परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात असलेल्या थडी पिंपळगावच्या रहिवासी आहेत. आपल्या गुरु विठामायवर गाणी म्हणताना अख्खी रात्र संपली तरी त्यांची गाणी संपत नसतात. शेकडो गाणी गात गुरु विठामायची आठवण करत राहतात.
जलसामाय सारखे अनेक शिष्य हे गुरु विठामायकडून मिळालेल्या ज्ञानाची परतफेड अशी गाणी गाऊन करत असतात. विठामायच्या सौंदर्यापासून ते, ती ज्या घोडीवर बसून चंद्रपूरला जायची त्या घोडीच्या वर्णनाची शेकडो गाणी जलसामाय गातात. जलसामाय आणि गुरू विठामायच्या मौखिक परंपरेची म्हणावी तशी नोंद झाली नाही. लौकिकार्थाने कोणतेही शिक्षण घेतलेले नसतानाही शेकडो गाणी त्यांना मुकोद्गत आहे. आज वयाच्या ७० वर्षानंतरही जलसामाय त्यांच्या खणखणीत आवाजात गाणी म्हणतात व आपल्या गुरु-शिष्याच्या आठवणींना उजाळा देतात.