मुंबई : जुलै महिन्यात जयपूर-मुंबई ट्रेनच्या गोळीबारात वरिष्ठ आणि तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंहला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने आज सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरीवर अशा आरोपाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याच्यावर तीन शिस्तभंगाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद : जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करताना आरपीएफ जवान चेतन सिंह चौधरी (वय 33) याने एका बुरखाधारी महिलेलाही रायफलचा धाक दाखवून ‘जय माता दी’ म्हणायला भाग पाडले होते. यावेळी महिलेने त्याच्या रायफलला हात लावल्यानंतर त्याने तिला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देखील दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. जयपूर एक्स्प्रेसच्या बी 3 कोचमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार चित्रित झाला आहे. त्यामुळे पोलिसांकडे याबाबत पुरावे आहेत.
जयपुर एक्सप्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबार : सीसीटीव्हीच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी या महिला प्रवाशाची ओळख पटवून तिचा जबाब नोंदवला आहे. आरोपी चेतन सिंहने 31 जुलैला जयपुर एक्सप्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबारादरम्यान रायफलचा धाक दाखवून एका बुरखाधारी महिलेला थांबवले. तिला 'जय माता दी' म्हणण्यास सांगितले. घाबरलेली महिला 'जय माता दी' म्हणाली. मात्र, त्यावर त्याचे समाधान झाले नाही. त्याने पुन्हा तिला मोठ्या आवाजात 'जय माता दी' म्हणण्यास सांगितले. त्यावेळी बुरखाधारी महिलेने त्याची रायफल बाजूला करून तू कोण आहेस? असे विचारले. त्यामुळे रागात चेतन सिंहने रायफलला पुन्हा हात लावल्यास गोळ्या घालेन, अशी धमकी त्या महिलेला दिली.
साक्ष आरोप सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण : याप्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला साक्षीदार केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी चेतन सिंह विरोधात भारतीय दंड संविधान कलम 153 (अ) धार्मिक द्वेष निर्माण केल्याप्रकरणी लावण्यात आले होते. या महिलेची साक्ष धार्मिक द्वेष निर्माण केल्याबाबत आरोप सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चेतन सिंहने असगर याच्या मृतदेहाच्या शेजारी उभे राहून धार्मिक द्वेष पसरवणारे भाष्य केले होते. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील आवाज आरोपीचाच असल्याचा तपास करण्यात आला आहे. त्यासाठी त्याच्या आवाजाचे नमुनने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठवण्यात आले होते. ध्वनिचित्रफितीचे रासायनिक विश्लेषण करून पडताळणी करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- Jaipur Mumbai Train firing : आरोपी आरपीएफ जवानाला आज तीन वाजता न्यायालयात करण्यात येणार हजर, गोळीबाराचे काय आहे प्रकरण?
- Jaipur Mumbai Train Firing: चेतन सिंहच्या साहित्यिक भाषेमुळे गोळीबाराचे कारण उलगडेना! ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत होणार चौकशी
- Mumbai Train Firing : जवान गोळीबारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल, आरोपीला उद्या न्यायालयात हजर करणार