मुंबई - सीएसटी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलजवळील कसाब पूल गुरुवारी सायंकाळी कोसळला त्यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४० लोक जखमी झाले आहेत. त्यामध्ये जाहिद खान हा ३२ वर्षीय तरुण आपल्या व्यवसायासाठी असणारे सामान आणण्यासाठी सीएसटी परिसरात आला होता. मात्र, तो त्या परिसरातून कसाब पुलावर जात असताना ही दुर्घटना घडली. यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
जाहिद खान हा घाटकोपरला राहणारा तरुण होता. त्याचा बेल्ट आणि पाकिटाचा व्यवसाय होता. तो आपल्या व्यवसायासाठी लागणारे सामान खरेदी करण्यासाठी सीएसटी परिसरात आला होता. त्याच्या पश्चात वडील सिराज खान, २ भाऊ, २ मुली व पत्नी असा परिवार आहे. घरी कमावणारा तो एकमेव व्यक्ती होता, असे त्याच्या भावाने सांगितले. जेव्हा घटना घडली, तेव्हा त्याचे वडील त्याच्यासोबत होते. परंतु, ते पुढे असल्याने पूल कोसळल्याबरोबर तो खाली कोसळला व वडीलही कोसळले. मात्र, वडिलांना कोणतीही इजा झालेली नाही. परंतु त्यांनी आपला एक मुलगा गमावला. जाहिदच्या जाण्याने त्यांच्या घरावर मोठे संकट कोसळले आहे. त्याच्या पश्चात घरच्यांचे काय याची चिंता त्याच्या घरच्यांनी व्यक्त केली.
संबंधित घटना सरकारच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे, असे मत घरच्यांनी व्यक्त केले आहे. सरकारने घरच्यांना पैसे दिले म्हणजे आमचा माणूस परत येत नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. या दुर्घटनेविषयी बोलताना ते म्हणाले, की लवकरात लवकर अशा पुलांकडे सरकारने लक्ष द्यावे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत याकडे लक्ष द्यावे, असे मत जाहिदचा भाऊ कलाम यांनी व्यक्त केले.