मुंबई - विधानसभा निवडणुकांमध्ये (२००९) अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागण्यासाठी आले होते", असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. 'लोकसत्ता'तर्फे घेण्यात आलेल्या 'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केल्यानंतर लागलीच त्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आपल्या मुलाखतीत गौप्यस्फोट करण्यासाठी माझा असा चुकीचा आणि खोटा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही, एवढंच मी सांगेन", असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात या मुद्द्यावरून भाजपा आणि मनसेमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
'यापूर्वीसुद्धा त्यांनी असे अनेक आरोप केले आहेत'
राज ठाकरेंनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना करताना अतुल भातखळकर यांनी राज ठाकरेंना खोचक टोला देखील लगावला आहे. "राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी असे अनेक आरोप केले आहेत. पण मी त्यांच्याकडे कायम त्याकडे दुर्लक्ष केल आहे असही भातखळकर म्हणाले आहेत.
'माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय'
२००९ च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना २०२१ ला द्यावा वाटतोय याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय", असही ते म्हणाले. तसेच, "मी भारतीय जनता पार्टीत होतो, आहे आणि कायम राहीन. माझ्या दृष्टीने पक्ष सोडणं म्हणजे आईचा त्याग करण्यासारखं आहे. हे मी त्यावेळीही सांगितलं होतं आणि आज पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतोय", असं देखील भातखळकर यांनी स्पष्ट केलं आहे.