मुंबई : राज्यात सत्तेवर आलेले शिंदे-फडणवीस सरकार हे असंविधानिक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोणतेही पत्र नसताना सरकार स्थापन : सत्ता स्थापनेसाठी भाजप अथवा शिंदे गटाला कोणतेही पत्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी पाठवले नव्हते. असे असताना कशाच्या आधारावर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले, याची माहिती राज्यपालांनी उघड करावी. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये अशा पद्धतीचे कोणतेही पत्र सत्ता स्थापनेपूर्वी शिंदे-फडणवीस गटाला देण्यात आले नव्हते, असेही स्पष्ट झाले असल्याचा दावा महेश तपासे यांनी केला आहे.
प्रश्नावर खुलासा करण्याची मागणी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विचारलेल्या प्रश्नावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ताबडतोब खुलासा करावा आणि हे असंविधानिक सरकार कसे काय स्थापन केले याबाबत उत्तरे द्यावी, अशी मागणी ही तपासे यांनी केली आहे.
राज्यपालांची पदमुक्तीची इच्छा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत माहिती दिली की, पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान, त्यांना सर्व राजकीय जबाबदाऱ्या सोडण्याची आणि उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता राजकीय स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
मुझे जाने का है : महाविकास आघाडी सत्तेत असताना देखील राज्यपालांच्या भेटीवेळी त्यांनी मुझे जाने का है असे म्हणत राज्यपाल पदावरून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आता त्यांनी लेखी विनंती केली आहे तर केंद्र सरकार लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करेल, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, मधल्या काळात राज्यपालांनी जी वक्तव्ये केली ती बघता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता राज्यपालांनीच इच्छा व्यक्त केली आहे यामुळे त्यांचा विचार झाला पाहिजे, असेही जयंत पाटील म्हणाले. केंद्रसरकारच्या काही प्रोसीजर बाबी असतील किंवा त्यांना नवीन राज्यपाल रिप्लेस करण्यासाठी माणूस मिळाला नसेल, असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.
राज्यपालांना उशिरा सुचलेले शहाणपण : रविकांत तुपकरराज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या पत्रावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोश्यारी स्वतःला कार्यमुक्त करीत असल्याची माहिती जर खरी असेल तर ती आनंदाची बाब आहे. आतापर्यंत अनेक राज्यपाल लाभले परंतु त्यांचे वाद किंवा राज्यात अस्थिरता निर्माण झाली नाही. कोश्यारी यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्याने जन आक्रोश निर्माण होऊन अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान अनेकांच्या जिव्हारी लागले. ते स्वतःहून कार्यमुक्त होत असेल तर कोश्यारी यांनाही उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. राज्यपाल हे पद जबाबदारीचे आहे. या जबाबदारीच्या पदावर जबाबदारीने वागावे लागते. राज्यपालांनी कमी बोलायचे असते आणि जास्त काम करायचे असते. राज्यपाल पदाची गरिमा सांभाळता यायला हवी. येणाऱ्या माणसाने ती सांभाळावी, अशी अपेक्षाही रविकांत तुपकर यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा: Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न - फडणवीस