मुंबई संयुक्त राष्ट्र संघाकडून २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची थिमही "Share Facts On Drugs, Save Lives" ही ठेवण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात मुंबई पोलिसांकडून कारवाई केली जाते. अशातच गेल्या सहा महिन्यात 43 कोटींची तस्करावर कारवाई मुंबई पोलिसांनी केलेली आहे. या कारवायांचा आढावा घेणारा 'ईटीव्ही भारत' चा विशेष रिपोर्ट...
सहा महिन्यात 43 कोटींची तस्करावर कारवाई -
गेल्या सहा महिन्यात मुंबई शहरात अमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून 1 हजार 255 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये 1 हजार 379 आरोपींना अटक करण्यात आलेली असून तब्बल 3 हजार 326 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत ही तब्बल 42 कोटी 94 लाख 18 हजार एवढी आहे.
या झाल्यात कारवाया -
- हेरॉईन - या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी मुंबई पोलिसांनी तब्बल 1 कोटी 71 लाख रुपयांचे हेरॉइन जप्त करत 6 गुन्हे नोंदवत 6 आरोपींना अटक केलेली आहे.
- चरस - या अमली पदार्थांच्या तस्करीत संदर्भात 22 गुन्हे दाखल करत 39 आरोपींना अटक करण्यात आलेली असून तब्बल 45 किलो चरस जप्त केलेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत तब्बल 12 कोटी 5 लाख 65 हजार एवढी आहे.
- कोकेन - पदार्थाच्या तस्करी संदर्भात मुंबई पोलिसांनी 3 गुन्हे दाखल करत 3 आरोपींना अटक केली असून 3 कोटी 91 लाख 80 हजार रुपयांचे कोकेन अमली पदार्थ जप्त केलेले आहे.
- गांजा - मुंबई शहरात सर्वाधिक तस्करी होणाऱ्या गांजा अमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली असून यात 132 गुन्हे दाखल करत 152 आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केलीं असून तब्बल 3 हजार 112 किलो गांजा हे अमली पदार्थ जप्त केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत 6 कोटी 7 लाख 28 हजार एवढी आहे.
- एमडी - मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अमली पदार्थ तस्करांकडून विकल्या जाणाऱ्या एमडी या अमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करत 53 गुन्हे नोंदवत 68 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. तब्बल 34 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले असून आंतराष्ट्रीय बाजारात एमडी अमली पदार्थाची किंमत 18 कोटी 55 लाख 20 हजार एवढी आहे.
अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई -
अमली पदार्थांचे सेवन करण्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या 6 महिन्यात मुंबई शहरात तब्बल 1013 गुन्हे दाखल झालेले आहेत. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 1075 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अमली पदार्थांच्या इतर प्रकरणांमध्ये 24 गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये 34 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 134 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत.
मुंबई पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन -
सध्याची युवा पिढी ही विविध कारणांमुळे अमली पदार्थांच्या आहारी जात असून या अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना मानसिक व शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अमली पदार्थांच्या तस्करी मुळे समाजाचे व देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटलं आहे. अमली पदार्थांच्या मार्फत मिळालेला पैसा हात देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. यामुळे देशाची सुरक्षितता व सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त म्हणत आहेत.