मुंबई - मुंबईत जीवाची बाजी लावून कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे इंटर्न कोविडसाठी काम करत आहेत त्यांना महिना 50 हजार रुपये स्टायपेंड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिका रुग्णालयातील इतर इंटर्नचेही स्टायपेंड 6 हजारांवरून 11 हजार रुपये करण्यात आले.
राज्यभरातील इंटर्न डॉक्टरांना 11 हजार रुपये स्टायपेंड देण्याचा निर्णय सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आला होता. मुंबई महानगरपालिका रुग्णालये वगळता राज्यभरातील रुग्णालयांत याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता नायर, सायन, कुपर आणि केईएम या पालिका रुग्णालयातील 500 हून अधिक इंटर्न डॉक्टरांनी गेल्या आठवड्यात 11 हजार स्टायपेंड देण्याची मागणी उचलून धरली होती. तर कोविडसाठी काम करण्याऱ्यांना 50 हजार स्टायपेन मिळावे अशीही मागणी करण्यात आली होती. असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नने (आस्मि) यासाठी राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली होती.
अखेर पालिकेने ही मागणी मान्य केल्याची माहिती, आस्मिचे अध्यक्ष डॉ. वेदकुमार घंटाजी यांनी दिली. या निर्णयावर आस्मिने समाधान व्यक्त केले आहे. आज मुंबईत 200 हून अधिक इंटर्न कोविडसाठी काम करत आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी बाब आहे, असेही डॉ. वेदकुमार यांनी सांगितले. दरम्यान, निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनेही 25 हजार रुपये स्टायपेंड वाढीची मागणी केली होती. त्यानुसार निवासी डॉक्टरांना 10 हजार रुपये वाढ देण्याचाही विचार सुरू आहे. मात्र, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.