मुंबई - महाराष्ट्रात ग्रामपंचायतींचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष तर काही ठिकाणी सन्नाटा होता. मात्र, या काही घडामोडी संपुर्ण राज्याचे नाही तर देशाचे लक्ष वेधून घेत होत्या. अशाच काही घटनांचा घेतलेला 'ई टीव्ही भारत'ने हा विशेष आढावा.
- निवडणूक जिंकल्यानंतर कारभारीला खांद्यावर घेत कारभारणीने काढली मिरवणूक
राजगुरुनगर (पुणे) - निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विजयी उमेदवाराला त्याचे चाहते, कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात खांद्यावर घेऊन मिरवणूक काढताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण पती निवडून आला म्हणून पत्नीने खांद्यावर उचलून मिरवणूक काढली, अशी घटना तुम्ही आजपर्यंत ऐकली नसेलच. मात्र अशी घटना घडली आहे पुण्यातील पाळू या गावात.
खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील पाळू गावात ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष शंकर गुरव यांनी विरोधी उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. संतोष यांच्या या विजयानंतर पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगणाला भिडला आणि तिने चक्क आपल्या पतीलाच खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढत जल्लोष केला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक काढणे, गुलाल उधळणे व गर्दी करणे, यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना रेणुका गुरव यांनी आपले पती संतोष यांना खांद्यावर घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत गावांमध्ये फेरी मारली. त्यांच्यामागे कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत गुलालाची उधळण केली. तिच्या या जल्लोषाचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.
सविस्तर वाचा - चर्चा तर होणारच! निवडणूक जिंकल्यानंतर कारभारीला खांद्यावर घेत कारभारणीने काढली मिरवणूक
- क्रिकेटच्या मैदानात नियतीने हरवले मात्र, निवडणुकीच्या रिंगणात जनतेने जिंकवले
सांगली - काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या मैदानात नियतीने त्याला हरवले होते. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात जनतेने त्याला विजयी केले. तासगाव तालुक्यातील ढवळी येथील तरुणाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्यांनी ग्रामपंचायतची निडवणूक लढवली होती. उमेदवार असणाऱ्या अतुल पाटील यांचा काल झालेल्या मतमोजणीमध्ये विजय झाला आहे.
क्रिकेट खेळताना एका औषध विक्रेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना १६ जानेवारीला घडली होती.अतुल पाटील असे या तरुणाचे नाव होते. अतुल हे तासगाव तालुक्यातील ढवळी गावचा माजी उपसरपंच होते. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात ते भाजपा गटाचा उमेदवार म्हणून उभे होते. अतुल पाटील यांचे गावात औषधाचे दुकान आहे. ते सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सदस्य सुद्धा होते. केमिस्ट असोसिएशनच्यावतीने दरवर्षी प्रमाणे क्रिकेटच्या स्पर्धा आटपाडी याठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेत अतुल हे तासगाव तालुका संघाच्यावतीने खेळाडू म्हणून खेळत होते. खेळाच्या दरम्यान यष्टीरक्षण करताना अतुल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अतुल हे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचे खासदार संजयकाका पाटील गटाकडून उमेदवार होते. 15 जानेवारी रोजी गावात मतदान झाले आणि त्यानंतर 16 जानेवारीला ते आटपाडी येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आला होता.
सोमवारी ढवळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये अतुल पाटील 333 मतांनी विजय झाले आहेत. अतुल पाटील याच्या निधनानंतर निवडणुकीचा निकाल लागला आहे. अतुल पाटील याचा विजय झाला मात्र, हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अतुल पाटील हयात नाहीत.
सविस्तर वाचा - क्रिकेटच्या मैदानात नियतीने हरवले मात्र, निवडणुकीच्या रिंगणात जनतेने जिंकवले
- परदेशात असूनही गावाची नाळ जपली, विजयी गुलाल फॉरेन रिटर्न दाम्पत्यावर
जपान, स्वीडनची लाईफ सोडून करणार गावाचा विकास
हिंगोली- डीग्रस वाणी येथील डॉ.अनिल कुऱ्हे व डॉ. चित्रा कुऱ्हे हे दाम्पत्य आदिवासी समाजातील असून, हे गेली आठ वर्षे विदेशात वास्तव्यास होते. डॉ. चित्रा यांना पाच भाषा अवगत आहेत, स्वीडन, जपान येथे हे कुटुंब वास्तव्यास होते.अनिल कुऱ्हे यांचे मूळ गाव डीग्रस असल्याने, त्यांचे नेहमीच गावाकडे येणे-जाणे सुरू राहायचे. या कालावधीमध्ये ते सातत्याने समाज सेवेमध्ये गुंतून घेत असत. हीच समाजसेवा या निवडणुकीमध्ये या कुटुंबाला लाभदायी ठरत मतदारांनी संधी दिली आहे. वास्तविक पाहता या कुटुंबांनी पॅनल उभा केला होता, त्या विरोधात गावातील प्रस्थापित पॅनल होता, मात्र मतदारांनी प्रस्थापित पॅनलच्या उमेदवारांना डावलून डॉक्टर कुऱ्हे यांच्या बहुजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून दिले आहे.
बहुजन आघाडी पुरस्कर्ता ग्राम विकास आघाडीच्या वतीने या कुऱ्हे कुटुंबानी राजकारणात प्रवेश केला. सरपंच पदाची निवडणूक थेट होत नसली तरी, डॉ. चित्रा यांनाच सरपंच पदाचा उमेदवार जाहीर केले अन तसाच प्रचार देखील केला. यांच्या पॅनलमध्ये महिला उमेदवारांची संख्या ही सर्वाधिक जास्त होती. नेहमीच समाज कार्यात धावून येत आलेल्या या कुटुंबाला या निवडणुकीत चांगली संधी देत, 9 पैकी 8 जागांवर उमेदवार निवडून दिले आहे.
सविस्तर वाचा - परदेशात असूनही गावाची नाळ जपली, विजयी गुलाल फॉरेन रिटर्न दाम्पत्यावर
- बीड: ना गुलाल...ना मिरवणूक, स्वच्छता मोहीम राबवत नवनिर्वाचित ग्रा. प. सदस्यांनी केला विजयाचा उत्सव साजरा
बीड- गावचा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर नवोदित ग्रामपंचायत सदस्यांनी ना गुलाल उधळला... ना मिरवणूक काढली. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या विजयाचा आनंद चक्क हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव झाडून काढत स्वच्छतेचा संदेश दिला. ही प्रेरणादायी मोहीम राबवली आहे ती बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील पैठण येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी....
बीड जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी हाती आले गावागावांमध्ये मिरवणुका गुलाल उधळून नवनिर्वाचित सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील पैठण येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे निवडून आल्यानंतर गावात मिरवणूक काढण्यापेक्षा चक्क निवडून आलेल्या नऊही सदस्यांनी हातात झाडू घेऊन पैठण गाव स्वच्छ केले. निवडून आल्यानंतर थाटामाटात मिरवणूक काढण्यात पेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. त्यांच्या या कृतीची जिल्हाभरात मोठी चर्चा होत आहे.
सविस्तर वाचा - ना गुलाल...ना मिरवणूक, स्वच्छता मोहीम राबवत साजरा केला विजयाचा आनंद!