मुंबई - शहरामध्ये आता सुशोभिकरण कामाची धामधुम सुरू झाली आहे. कारणही तसेच आहे. जी-२० परिषदेच्या व्यापार व गुंतवणूक समूहाची बैठक येत्या २८ ते ३० मार्चला मुंबईत होत आहे. या निमित्ताने विविध देशातील प्रतिनिधी मुंबईत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने सुशोभीकरण आणि स्वच्छ्ता याची कामे हाती घेतली आहेत. त्या कामांची आज पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पाहणी केली. यावेळी विविध प्राधिकरणाना विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले.
महापालिकेकडून विशेष प्रयत्न - मुंबईत डिसेंबरमध्ये जी-२० परिषदेची पहिली बैठक झाली होती. त्यावेळी महापालिकेने केलेल्या शहर सुशोभीकरण कामांची केंद्र सरकारने देखील वाखाणनी केली होती. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून जगात प्रसिद्ध असून जी-20 परिषदेच्या विविध गटांच्या बैठका मुंबईत होणार आहेत. यानिमित्ताने मुंबईचे पर्यायाने महाराष्ट्राचे ठळक स्थान जी-20 बैठकांवेळी अधोरेखित व्हावे, म्हणून बृहन्मुंबई महापालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
उद्यापासून जी 20 परिषद - मुंबईमध्ये उद्यापासून सुरू होत असलेल्या जी 20 व्यापार आणि गुंतवणूक गटाच्या बैठकीआधी महापालिकेने बैठकीची ठिकाणे व प्रतिनिधी राहणार असलेल्या हॉटेल्स् परिसरांमध्ये सुशोभीकरण, स्वच्छता यादृष्टीने विशेष कामे केली आहेत. ग्रॅण्ड हयात हॉटेल (सांताक्रुझ) ते ताज लॅण्ड्स एण्ड (वांद्रे) परिसर यासह सांताक्रूझ, कलिना परिसर, कलानगर, वांद्रे-कुर्ला संकूल, मिठी नदी परिसर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभाग कार्यालय परिसर, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड परिसर आदी परिसरांचा यामध्ये समावेश आहे. या विभागातील कामांची पाहणी आयुक्तांनी केली.
कामांची पाहणी - जी-20 बैठकांच्या परिसरांमध्ये रस्त्यांची देखभाल आणि दुरूस्तीच्या अतिरिक्त कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच उद्यान विभागाने ठिकठिकाणी हरित सुशोभिकरण केले आहे. साफसफाई विभागाने सर्व परिसरांमध्ये स्वच्छतेची विशेष मोहीम राबवली तसेच सर्व कामे पूर्ण करुन घेतली आहेत. ठिकठिकाणी चौकांमध्ये तसेच पथदिव्यांच्या खांबांवरही रोशणाई करण्यात आली आहे. या सर्व कामांची आयुक्तांनी पाहणी करत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले.