मुंबई - महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांनी दिलेली कोणतीही बेकायदेशीर बिले मंजूर केली जाणार नाहीत. अशा बिलांची चौकशी करू, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. दावोसच्या दौऱ्यावर गेलेल्या एमआयडीसी अधिकाऱ्यांनी बोगस बिले दिली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलीक यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना देसाई बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एमआयडीसीचे अतिरिक्त सचिव सतीश गवई दावोस दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तब्बल ७ कोटी ६३ लाख रुपयांची बिले दिली असून, ही बिले बेकायदेशीर असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.
मुख्यमंत्री दौऱ्यावर जातात तेव्हा ९० लाख खर्च होतो. याच दौऱ्यांच्या अनुषंगाने ५ अधिकारी दौर्यावर जातात त्यावेळी ७ कोटी ६३ लाख रुपये कसे खर्च होतात ? असा सवाल करत मलिक यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून या बिलांची आणि गवई यांची चौकशी करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.
दौरा दावोसला आणि त्या दौऱ्यांच्या खर्चाची बिले अमेरिकेच्या कंपनीकडून कशी येतात, असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला. विरोधकांच्या या आरोपाची गंभीर दखल उद्योग विभागाने घेतली असून दावोस दौऱ्याच्या बिलांची चौकशी करू, असे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले आहे.