मुंबई - ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या संदर्भामध्ये ज्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्याची चौकशी व्हायला हवी, असे मत माजी निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले. खरं काय आहे ते बाहेर आले पाहिजे. कारण आपण लोकशाहीत जगत आहोत. लोकशाहीत जर चुकीचे काही घडत असेल तर आपण त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी असल्याचेही त्या म्हणाल्या.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील किमान ५ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल) मशीनमधून आलेल्या स्लीप आणि प्रत्यक्ष मतदान यंत्रातील मतदान याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी निवडणूक आयोगाने केवळ एकाच व्हीव्हीपॅट मशीनमधून येणाऱ्या स्लीप आणि प्रत्यक्ष मतदान याची पडताळणी करण्याचे निश्चित केले होते. पण विरोधी पक्षांच्या मागणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये वाढ केली आहे.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लीपची फेरपडताळणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील २१ प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्रितपणे केली होती. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांमध्ये फेरफार करता येऊ शकते. त्यामुळे या स्लीपची फेरपडताळणी करण्याची मागणीही विरोधी पक्षांनी केली होती. याआधी त्यांनी मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकेच्या साह्याने मतदान घेण्याची मागणी करण्यात आली होती. पण ती निवडणूक आयोगाने फेटाळून लावली होती.