मुंबई - यंदाच्या गुढीपाडवा सणावर कोरोनाचे गडद सावट पाहायला मिळत आहे. दरवर्षी घराच्या तोरणासाठी, पुजेसाठी आणि इतर कामांसाठी फुलांचा वापर होत असतो. मराठी नववर्षाची सुरुवात, साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणून गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. मात्र, यंदा फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. संचारबंदीमुळे लाखोंचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा - कोरोना निदान तपासणीचे भारतामध्ये पहिले किट तयार; पुण्यातील कंपनीला आले यश
दरवर्षी राज्यभर गुढीपाडवा दरवर्षी उत्साहात साजरा होता. या दिवशी घराला तोरण लावण्यापासून घरे, कार्यालये, दुकाने सर्व काही फुलांनी सजवली जातात. त्यामुळे दरवर्षी गुढीपाडव्याला फुलांची मागणी मोठी असते. यंदा मात्र गुढीपाडव्यावर कोरोना विषाणूने संक्रांत आणली आहे. मुंबई लॅाकडाऊन झाली असून, राज्यातही संचारबंदीही लागू झाल्याने यंदा गुढीपाडवा साधेपणाने साजरा केला जावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्राही रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी फुलांची मागणी घटल्याने फुलविक्रेते हवालदिल झाले आहेत.
दादर फुल मार्केटसह मुंबईतील अनेक फुलमार्केटमध्ये गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधीच फुलांची मोठ्या संख्येने आवक होते. फुलमार्केट फुलांसह ग्राहकांनी अक्षरश: फुलून जाते. झेंडूच्या फुलांना गुढीपाडव्यात विशेष मागणी असल्याने झेंडूच्या फुलांनी बाजार फुलतो. असे असताना आता गुढीपाडव्यासाठी काही तासच शिल्लक राहिले असताना, फुलमार्केटमध्ये मात्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हेच चित्र दादरमधील फुलमार्केटमध्येही आहे. गुढीपाडव्यात दरवर्षी फुलांची मोठ्या संख्येने विक्री होत असल्याने फुलविक्रेत्यांनाही चांगला नफा मिळायचा. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे फुलांची विक्री मंदावली असताना आता गुढीपाडव्यासारख्या दिवशीही ग्राहक फुलमार्केटकडे वळत नसल्याने फुलविक्रेत्यांमध्ये निराशा आहे.