मुंबई - महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जाण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. मात्र, यामागील वस्तुस्थिती काय आहे? प्रकल्प कोणामुळे बाहेर गेले?, मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक का झाली नाही? या सर्व बाबतीत एक महिन्यात श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच, आदित्य ठाकरे यांच्याशी स्वतः चर्चा करायला आपण तयार असल्याचे प्रतिआव्हान सामंत यांनी दिले आहे.
श्वेत पत्रिका काढणार - महाराष्ट्रातील उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होतो आहे. त्याची नेमकी वस्तूस्थिती काय आहे?, कुणाच्या काळात हे उद्योग राज्याबाहेर गेले?, राज्यात केवळ सामंजस्य करार केले म्हणजे उद्योग येत नाहीत, त्याची अंमलबजावणी होणे ही तितके महत्त्वाचे असते. गेल्या चौदा महिन्यांच्या काळात राज्यात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक का झाली नाही? असा प्रतिप्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक न झाल्यामुळे प्रकल्प बाहेर गेले का? या सर्व बाबतीत नेमकी वस्तूस्थिती काय आहे, याची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून एक श्वेतपत्रिका एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही जाहीर करणार आहोत, ज्यामुळे राज्यातल्या जनतेला आणि तरुणांना नेमकी वस्तूस्थिती काय आहे ते समजेल. प्रकल्प कुणामुळे बाहेर गेले याची माहिती होईल, असेही यावेळी सामंत म्हणाले आहेत.
साफरोन हैदराबादला आधीच ठरले होते - साफरोन ही कंपनी कधीच महाराष्ट्रात आली नव्हती, याबाबत चुकीचा प्रचार केला जात आहे. (5 जुलै 2022)रोजी राजनाथ सिंह यांची भेट घेऊन ही कंपनी हैदराबादला स्थापन करण्याची घोषणा कंपनीच्या संचालकांनी केली होती. याबाबत महाराष्ट्राकडे जमीन, वीज पाणी याबाबत कशाचीही मागणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात कधी आलाच नव्हता, तर तो गेला असे म्हणणे चुकीचे आहे असा दावाही सामंत यांनी यावेळी केला आहे. सिनार्मस हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील धेरंड या गावात होत आहे. महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघात हा प्रकल्प होणार आहे. मात्र, या प्रकल्पाचा केवळ करार झालेला आहे. अद्याप त्याची सुरुवात झालेली नाही, असे स्पष्टीकरणही सामंत यांनीही दिले आहे.
रिफायनरीबाबत स्पष्टता द्या - महाराष्ट्रात रिफायनरीला सातत्याने विरोध करणारी मंडळी आता बरसू येथील रिफायनरी बाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिण्याचे तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई सांगत आहेत. असे असेल, तर रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान सामंत यांनी दिले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान देण्यापेक्षा माझ्याशी थेट चर्चा करावी. राज्याचा उद्योग मंत्री मी आहे, त्यामुळे मी उत्तर द्यायला तयार आहे, असे प्रति आव्हानही सामंत यांनी दिले आहे.