मुंबई - भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील बालेवाडी येथे सुरू होणार आहे. 1995 साली झालेल्या क्रीडा प्रबोधिनीच्यानंतर हे पहिलेच आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी विद्यापीठ बनवले जात आहे, अशी माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी गुरुवारी (दि.17 डिसें.) पत्रकार परिषदेत दिली.
विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विद्यापीठ मंजूर
राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माली कुलगुरू डॉ . खोले यांच्या अध्यक्षतेखाली काही महिन्यांपूर्वी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी या विद्यापीठाच्या स्थापनेचा अहवाल क्रीडा मंत्री व संबंधित विभागाकडे दिला होता. यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळात आला. मंत्रिमंडळाने याला मान्यता दिली व याबाबतचे विधेयक 15 डिसेंबरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात आला. या विधेयकास विधीमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहातून एकमताने मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ असणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले.
2028 ऑलम्पिकसाठी यशस्वी खेळाडू बाहेर यावे हा हेतू
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे पुण्यातील बालेवाडी येथे स्थापन करण्यात येणार आहे. हे विद्यापीठ सन 2021-22 या वर्षापासून कार्यान्वित करण्याचे नियोजण करण्यात आले आहे. राज्यात सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे सुरू आहे. याच क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठामुळे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्या जातील. या संकुलामध्ये यापूर्वी आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन उत्कृष्टरित्या पार पडले आहेत. पण, आता 2028 ऑलम्पिक दृष्टीने यशस्वी खेळाडू बाहेर यावे, असे आम्हाला वाटते म्हणून हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे मंत्री केदार म्हणले.
क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या संधीही करणार उपलब्ध
महाराष्ट्र राज्याला क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर नावलौलिक मिळविणारे बरेच खेळाडू आतापर्यंत घडले आहेत व यापुढेही घडणार आहेत. क्रीडा सुविधांचा दर्जा वाढविणे तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणे याबरोबरच क्रीडा क्षेत्रात विविध शाखांमध्ये अभ्यासक्रम सुरू करुन तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन, भविष्यात क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करणार आहोत, असे क्रीडा मंत्री म्हणाले.
संकुलामुळे मिळणार अनेकांना रोजगार
या क्रीडा विद्यापीठासाठी राज्य शासनाकडून टप्याटप्याने चारशे कोटी निधी देण्यात येणार आहे. या विद्यापीठासाठी सध्याच्या आवश्यकतेनुसार नियमित वेतनश्रेणीतील 166 पदे व ठोक वेतनावरील 47 पदे, अशी एकूण 213 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये कुलगुरु, कुलसचिव त्यांची कार्यालयीन पदे, शिक्षकीय पदे व प्रशासकीय पदांचा समावेश आहे. तसेच विशेष तज्ज्ञ मानधनावर किंवा करार पध्दतीने आंमत्रित करण्यात येणार आहेत. या क्रीडा संकुलामुळे अनेकांना रोजगार मिळणार असल्याचेही क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले.
हेही वाचा - पोलीस मारहाण प्रकरण : अर्णब गोस्वामींकडून अटकपूर्व जामीन याचिका मागे
हेही वाचा - नंग्या तलवारी घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक; पोलीस हवालदार जखमी