मुंबई - मध्य रेल्वेच्या पहिल्या वर्चुअल प्लॅटफॉर्मवरील स्थायी तडजोड यंत्रणेच्या (पीएनएम) बैठकीत भारतीय रेल्वेवरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे एक अॅप लॉंच करण्यात आले आहे. या ॲपवर सुमारे 540 पुस्तके, अभ्यासाचे साहित्य आणि 100 व्हिडिओ, महत्त्वाचे वेबसाइट लिंक उपलब्ध आहेत.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिल्या वर्चुअल प्लॅटफॉर्मवरील स्थायी तडजोड यंत्रणेच्या (पीएनएम) सभेला संबोधित केले. अपर महाव्यवस्थापक आणि पीएनएमचे उपाध्यक्ष बी. के. दादाभोय हे देखील सहभागी झाले होते. डॉ. ए.के. सिन्हा, मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कर्मचारी अधिकारी यांनी मान्यताप्राप्त युनियन यांच्यासह ही पीएनएम बैठक आयोजित केली होती.
बैठकीला मध्य रेल्वेचे विभाग प्रमुख व सर्व संबंधित विभागीय रेल्वे व्यवस्थापक आपापल्या कार्मिक शाखा प्रमुखांसह हजर होते. संजीव मित्तल यांनी "इंडियन रेल्वे ऑनलाईन ट्रेनिंग" या अॅपचे उद्घाटन केले. अँड्रॉइड ॲप व 'रेल परिवार देख रेख मुहीम' यांचे सादरीकरणही करण्यात आले.
या ॲपवर सुमारे 540 पुस्तके, अभ्यासाचे साहित्य आणि 100 व्हिडिओ, महत्त्वाचे वेबसाइट लिंक उपलब्ध आहेत. मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस) उपलब्ध आहे. वेबसाइट लिंक www.irot.in वर दर्शक विविध विषयांवरील ऑनलाइन व्याख्यानांना उपस्थित राहू शकतात.