मुंबई - भारतीय वंशाच्या श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझनेस स्कूलचे नवीन (अधिष्ठाता)डीन म्हणून निवड झाली. हार्वर्ड बिझनेस स्कूल प्रशासनाकडून काल याबाबत घोषणा करण्यात आली. श्रीकांत यांनी मुंबई विद्यापीठात पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून आयआयएम अहमदाबाद येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे.
श्रीकांत दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अकरावे डीन आहेत. 1 जानेवारी २०२१ पासून ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान डीन नितीन नोहरिया यांच्या जागेवर ते रुजू होणार आहेत. जगभरात अत्यंत नामांकित असलेल्या हार्वर्डला 112 वर्षाची शैक्षणिक परंपरा आहे. त्याठिकाणी मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या दातार यांची नियुक्ती झाल्याने राज्यभरातील तज्ञांनी याचे स्वागत केले आहे.
गेल्या पंचवीस वर्षांपासून श्रीकांत हे हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते 'ऑर्थर लोवेस डीकिन्सन प्रोफेसर आणि युनिव्हर्सिटी अफेयर्स'चे सीनियर असोसिएट डीन आहेत. त्यांची निवड ही त्यांना दिलेल्या पदोन्नतीचा भाग असल्याचे हार्वर्ड प्रशासनाने म्हटले आहे. दातार हे एक कल्पन शिक्षक आणि अनुभवी अकॅडमिक लीडर आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी ते अत्यंत सकारात्मक विचार घेऊन चालणारे तज्ञ असल्याचे हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष लैरी बैकोव यांनी सांगितले.
122 वर्षे जुन्या असलेल्या हार्वर्ड विद्यापीठातील कोणत्याही विभागाचे डीन हे पद अत्यंत प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे मानले जाते. जगभरातील संशोधक आणि विद्यार्थ्यांचा कल हे विद्यापीठ व त्याच्या इतर संस्थांकडे आहे. दातार यांच्या निवडीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य व एम फुक्टो संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनी दिली.
दातार यांनी 1973मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण हे आयआयएम अहमदाबाद येथून घेतले. त्यानंतर त्यांनी परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून 'स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्स' या विषयावर पीएचडी केली आहे. 1996मध्ये ते हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. डाटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इनोव्हेटिव्ह प्रॉब्लम सोल्विंग अँड मशीन लर्निंग याविषयावर त्यांचे खूप मोठे योगदान आहे.