मुंबई- गंभीर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रभावी मानले जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा असून त्याचा काळाबाजार सुरू आहे. परिणामी गरजू रुग्णांना हे इंजेक्शन वेळेत मिळत नसल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या राज्यात रुग्णसंख्या अधिक त्या राज्याला रेमडेसिवीरचा पुरवठा अधिक असे सूत्र कंपन्यांनी, केंद्राने स्वीकारावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रने केली आहे.
महाराष्ट्रात देशातील 40 टक्के कोरोना रुग्ण आहेत, त्यामुळे बाजारात रेमडेसिवीरचा जो काही साठा येईल, त्यातील अधिक साठा महाराष्ट्राला द्यावा, अशी मागणी आयएमएने केलीआहे.
रेमडीसिवीरच्या निर्मितीसाठी दोन भारतीय कंपन्यांना परवानगी मिळाली. त्यानंतर जो साठा उत्पादित झाला, तो सगळा साठा तामिळनाडूने उचलला. त्यामुळे इतर राज्यांना काहीच मिळाले नाही. तर आताही रेमडेसिवीरच्या पुरवठ्याचे कोणतेही सूत्र नाही. तेव्हा रुग्ण संख्या कमी असताना साठा करुन ठेवला जात आहे. दुसरीकडे रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याचे चित्र आहे, अशी माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
मुळात दोनच कंपन्या उत्पादन करत असल्याने आणि आताच उत्पादन करण्यास सुरुवात झाल्याने पुरवठा कमी आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुडवडा जिथे सर्वाधिक रुग्ण आहेत अशा महाराष्ट्र आणि दिल्लीत निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येनुसार पुरवठा करावा, अशी मागणी डॉ. भोंडवे यांनी केली आहे.
राज्य सरकारनेही हे सूत्र अवलंबत ज्या जिल्ह्यात रुग्ण जास्त त्या जिल्ह्याला इंजेक्शनचा पुरवठा जास्त करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. उत्पादन वाढेपर्यंत तुटवडा जाणवणार आहे. तेव्हा असे पर्याय अवलंबले तरच ज्यांना गरज आहे, अशांना वेळेत इंजेक्शन मिळेल असेही ते म्हणाले.