मुंबई: Measles Patients In India: भारतामध्ये गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी गोवरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळामध्ये म्हणजेच 2020 मध्ये गोवरच्या 5604 रुग्णांची नोंद झाली होती, तर 2021 मध्ये 5700 रुग्णांची नोंद झालेली आहे. मात्र यावर्षी गोवरच्या 9489 रुग्णांची नोंद झाली आहे. 2019 मध्ये 10 हजार 430 रुग्णांची नोंद झाली होती.
भारतात 79 टक्के वाढ: गोवरचा आजार कायमचा जावा, यासाठी 2020 ही डेडलाईन ठेवण्यात आली होती. मात्र लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने लसीकरणाचे प्रमाण कमी होत गेले आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य एक्स्पर्टसनी याआधीच लसीकरणाचे प्रमाण कमी झाल्याने 2022 मध्ये गोवरच्या रुग्णांच्या उद्रेक होईल, असा इशारा दिला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार 2022 मध्ये 79 टक्के गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
मुंबईत लसीकरणाकडे दुर्लक्ष: लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम मुंबईमध्ये दिसून येत आहेत. मुंबईत 7 मुलांचा गोवर मुळे मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू संशयित मृत्यू म्हणून पाहिले जात आहेत. डेथ ऑडिट कमिटीच्या बैठकीनंतर हे मृत्यू गोवर मुळे झाले का ? हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान मुंबई मध्ये गोवर झालेल्या रुग्णांची शोध मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. ताप आणि पुरळ असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना 'अ' जीवनसत्व देणे आणि त्यांचे लसीकरण बाकी असल्यास लसीकरण करून घेण्यावरती भर देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये ज्यांनी गोवरचा लसीकरणामधील एक डोस चुकवला आहे. अशी 0 ते 2 वर्ष या वयोगटातील वीस हजार मुले आढळून आली आहेत. त्यांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. गोवंडी आणि मुंबईतील 8 विभागात गोवरचा प्रसार आहे. त्याठिकाणी अतिरिक्त लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
मुंबईत रुग्णसंख्येत 15 पटीने वाढ: मुंबईमध्ये 2020 मध्ये ताप आणि पुरळचे 279 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 25 रुग्णांना गोवर झाला होता. 2021 मध्ये त्यात वाढ होऊन ताप आणि पुरळचे 408 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 9 रुग्णांना गोवर झाला होता. 2022 मध्ये आतापर्यंत ताप आणि पुरळचे 1079 रुग्ण आढळून आले त्यापैकी 142 रुग्णांना गोवर झाला आहे. 2020 च्या तुलनेत 5 पटीने तर 2021 च्या तुलनेत 15 पटीने गोवरच्या रुग्णसंखेत वाढ झाल्याचे दिसून येते.