मुंबई INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या 13 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत शरद पवार, संजय राऊत यांचा समावेश आहे असं सुत्रानी सांगितलं आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेले नाही. थोड्याच वेळात इंडिया आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर अधिकृत माहिती मिळणार आहे. (India Aghadi Coordination Committee)
समितीत शरद पवारांचा समावेश : या समितीत के. सी. वेणुगोपाल, शरद पवार, संजय राऊत, एम के स्टॅलिन, तेज यादव, अभिषेक बॅनर्जी, राघव चढ्ढा, लल्लन सिंग, जावेद खान, डी. राजा, ओमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन, महेबुबा मुक्ती आदी नेत्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत थोड्या वेळात पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात येणार आहे.
सध्या भाजपा सूडबुद्धीनं काम करत आहे. देशातील तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर केला जात आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे. आम्ही सरकारच्या कामकाजावर हल्लाबोल करणार असून आमच्या काही सहकाऱ्यांवर छापे टाकण्याची शक्यता आहे. - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
संसदेचं विशेष अधिवेशन : केंद्र सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 'वन नेशन, वन इलेक्शन' या विषयावर समिती स्थापन केली आहे. सरकारनं 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर एका दिवसानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. अधिवेशनाचा अजेंडा गुप्त ठेवण्यात आला आहे. एका बाजूला निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपा (BJP) मित्र पक्षांना सोबत घेऊन महायुती अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडं देशातील सर्व विरोधी पक्षांची आघाडी देखील बैठकांवर बैठका घेऊन आपला अजेंडा फायनल करत आहे. मात्र, मोदी सरकार 'वन नेशन वन इलेक्शन घेण्याच्या दृष्टीनं पाऊल उचलत असल्यानं इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे.
वन नेशन वन इलेक्शन नावाचा नवा फुगा : या संदर्भात बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "इंडिया आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपा सध्या घाबरली आहे. त्यामुळंच त्यांनी वन नेशन वन इलेक्शन नावाचा नवा फुगा हवेत सोडला आहे. यांना जर खरंच वन नेशन वन इलेक्शन (One nation one election) घ्यायचं असेल, तर त्यांनी आधी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेऊन दाखवाव्यात. सोबतच मणिपूरमध्ये देखील त्यांनी निवडणूक घेऊन जिंकून दाखवावं. असा कोणताही निर्णय घेताना विरोधी पक्षाला विश्वासात घेणं अपेक्षित असतं. मात्र, आपल्याकडं तसं होताना दिसत नाही. खरंच वन नेशन वन इलेक्शन लागू करण्याआधी हिंमत असेल, तर फेअर इलेक्शन घेऊन दाखवा."
देशाच्या भल्यासाठी आमची लढाई : यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "आम्ही देशाच्या चांगल्यासाठी लढत आहोत. (We are fighting for best of India) आजच्या बैठकीत काही ठराव घेण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत घेतलेले निर्णय आम्ही एकत्र पत्रकार परिषद घेऊन जनतेला सांगू."
इंडिया आघाडीला मोदी घाबरले : या संदर्भात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, "पंतप्रधानांच्या मनात भीती दिसत आहे. याचं मोठं कारण म्हणजे ते इंडिया आघाडीला घाबरले आहेत. इंडिया आघाडीला भाजपा घाबरलीयं, आरएसएस घाबरलीयं. म्हणून वन नेशन वन इलेक्शन असं भाजपा बोलत आहेत. सर्व विरोधी पक्ष या हुकूमशाहीच्या विरोधात उभे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे."
'वन नेशन, वन इलेक्शन'ला विरोध : देशात 'वन नेशन, वन इलेक्शन'ची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या वर्षी जानेवारीमध्ये विधी आयोगानं यासंदर्भात राजकीय पक्षांकडून सहा प्रश्नांची उत्तरे मागितली होती. सरकारला 'वन नेशन, वन इलेक्शन'ची अंमलबजावणी करायची आहे. मात्र, अनेक राजकीय पक्ष याला विरोध करत आहेत.
हेही वाचा -