मुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १३ जानेवारी होती. अर्जाची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १६ जानेवारी असून, ३० जानेवारीला मतदान होणार आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणी असणार आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार वेणुनाथ कडू यांनी माघार घेतली.
कोकण मतदार संघाची निवडणूक: कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांची आमदार असण्याची मुदत ७ फेब्रुवारीला संपणार आहे. बाळाराम पाटील पुन्हा विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणूक लढवीत आहेत त्यांना शेकापसह महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे.
४१ हजार ५२० मतदार मतदान करणार: कोकण शिक्षक मतदार संघात पालघर जिल्ह्यात ९०००, ठाणे १५,७३६, रायगड १००००, रत्नागिरी ४३२८, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४५६ मतदार नोंदणी झाली असून एकूण ४१ हजार ५२० मतदार मतदान करणार आहेत.
वेणूनाथ कडू यांचा अर्ज मागे: शिंदे, शिवसेना-भाजप यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर म्हात्रे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू, शिक्षक भरतीचे रत्नागिरी जिल्ह्यातील धनाजी पाटील, शेकाप व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार बाळाराम पाटील हे निवडणूक लढविणार आहेत मात्र कोकण शिक्षक मतदार संघ उमेदवार वेणुनाथ कडू यांनी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि कार्यकर्ते उपस्थित होते भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना ते पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझा अर्ज मी स्वखुशीने मागे घेत आहे, असेही अपक्ष उमेदवार वेणूनाथ कडू यांनी सांगितले.