मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. 11 मार्चला 114 रुग्णांची नोंद झाली. त्यात गेल्या 6 दिवसात दुप्पट वाढ झाली आहे. आज 16 मार्चला 226 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत 35 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत असताना इन्फ्लुएन्झा या आजाराचे रुग्ण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
एच३ एन२ मुळे १ मृत्यू : १ जानेवारी ते १५ मार्च २०२३ या कालावधीत इन्फल्युएंझाची लक्षणे असलेले २,६६,९१२ एकूण संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी १५५८ रुग्णांना ऑसेलटॅमीवीर देण्यात आले. त्यात एच १ एन १ चे ३२४ तर एच३ एन२ चे ११९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील ७३ रुग्ण सद्या रुग्णालयात भरती आहेत. एच १ एन १ मुळे ३ तर एच३ एन२ मुळे १ मृत्यू झाला आहे. नागपूर येथील मृत्यू संशयित मृत्यू म्हणून नोंद झाला होता. डेथ ऑडिट कमिटीने केलेल्या मृत्यू परिक्षणानंतर मृत्यूच्या कारणाची निश्चिती करण्यात आली. सदर रुग्णाचा मृत्यू हा प्राथमिक रित्या एच३एन२ या संसर्गामुळे झाला नसल्याचे डेम ऑडीट समितीने निश्चित केले आहे. यामुळे एच३ एन२ मुळे १ मृत्यू झाला आहे.
काय आहे इन्फल्युएंझा : इन्फल्युएंझा हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फल्युएंझा टाईप ए चे उपप्रकार एच१एन१, एच २एन २, एच ३ एन २ हे उपप्रकार आहेत. यात ताप, खोकला, घशात खवखव धाप लागणे, न्यूमोनिया इत्यादी लक्षणे आढळतात. इन्फल्युएंझाबाबत रुग्ण सर्वेक्षण हे मुख्यतः लक्षणाधारीत आहे. आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी व लक्षणानूसार उपचार करण्यात येतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना : कोविड १९, इन्फल्यूएंझा बाबत नियमित रुग्ण सर्वेक्षण सहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना निर्गमित आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांना व्हीसी दवारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. फल्यू सदृश रुग्णांवर वर्गीकरणानूसार विनाविलंब उपचार करण्यात येतो. राज्यातील शासकिय रुग्णालयामध्ये तसेच वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
औषधांचा साठा उपलब्ध : आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा उपलब्ध आहे. राज्यातील सर्व शासकिय व खाजगी डॉक्टरांची क्लिीनीकल मॅनेजमेंटबाबत राज्यस्तरावरून पुर्नप्रशिक्षण ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आले. १७ मार्च २०२२ रोजी पुन्हा प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. ६ मार्च २०२३ रोजी राज्यस्तरावरून सर्व जिल्ह्यांना सर्वेक्षण, प्रतिबंध व उपचाराबाबत मार्गदर्शक लेखी सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. डेथ ऑडीट करणेबाबत राज्यस्तरावरुन सूचना देण्यात आल्या आहेत. फल्यू प्रतिबंधासाठी आय ई सीचे प्रोटोटाईप देण्यात आले अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात 226 नवे रुग्ण : राज्यात आज 16 मार्च रोजी 226 रुग्णांची नोंद झाली आहे. 87 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या 926 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 39 हजार 055 रुग्णांची नोंद झालेली आहे त्यापैकी 79 लाख 89 हजार 703 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 426 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 3 मार्चला 66, 7 मार्चला 80, 9 मार्चला 90, 10 मार्चला 93, 11 मार्चला 114, 12 मार्चला 101, 14 मार्चला 155, 15 मार्चला 176 रुग्णांची नोंद झाली.
मुंबईत 35 रुग्णांची नोंद : मुंबईत आज 16 मार्च रोजी 35 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 168 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण 11 लाख 55 हजार 667 रुग्णांची नोंद झाली आहे त्यापैकी 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 2 मार्चला 18, 9 मार्चला 18, 10 मार्चला 21, 11 मार्चला 25, 12 मार्चला 19, 14 मार्चला 36, 15 मार्चला 36, 16 मार्चला 31 रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत अतिरिक्त 1500 बेड सज्ज : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये सध्या विविध रुग्णालयात 4351 खाटा उपलब्ध आहेत. कोरोना सह इन्फ्लुएन्झा आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 150 रुग्णालयातील 1500 बेडस तैनात ठेवा असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास स्टँडबायवर असलेली कोविड सेंटर सुरू करून तेथे रुग्णांवरती उपचार केले जातील अशी माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
अशी वाढतेय रुग्णसंख्या -
11 मार्च 114
12 मार्च 101
14 मार्च 155
15 मार्च 176
16 मार्च 226
हेही वाचा - Death Of H3N2 Patient : पिंपरी-चिंचवड शहरात H3N2 बाधित रुग्णाचा मृत्यू