मुंबई - मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची सोय व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या उपाय योजना केल्या आहेत. परंतु, चेंबूर येथील १७३ मतदान केंद्रावरील दिव्यांग मतदारांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. केवळ दिखावा म्हणून येथे जुन्या प्लास्टिक खुर्चीला लाकडी बांबू बांधून डोली तयार करण्यात आली आहे.
चेंबूर येथील बूथ क्रमांक ६४ ते ७० मध्ये दिव्यांगांसाठी कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही. प्रशासनाने दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी व्हीलचेअरच्या जागी चक्क जुन्या प्लास्टिकच्या खुर्चीला २ लाकडी बांबू बांधून डोली तयार केली आहे. त्यावर कोणीही बसत नाही. सकाळी १ महिला त्यावरून खाली पडली, असे चेंबूर येथील स्थानिक मतदार मोहनसिंग खत्री यांनी सांगितले.
राज्यात चौथ्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे. अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद होत आहे. या चौथ्या टप्प्यात मुंबईतील दक्षिण मध्य मतदार संघात मतदान पार पडत आहे. मतदान केंद्रावर जाण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास कुणी नसल्यास, ते मतदानापासून मुकतात. यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक बूथवर व्हिलचेअर ठेवले आहेत.
मुंबईत मतदारसंघातील काही केंद्रावर दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, चेंबूरच्या सुभाषनगर मतदान केंद्रावर केवळ देखावा दाखवण्यासाठी डोली तयार करण्यात आली आहे. डोलीवर दिव्यांग लोकांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी २ ते ३ कामगार ठेवले आहेत.
मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. काही वेळापूर्वी मीही त्या डोलीवरून खाली पडलो आहे. मी प्रत्येक निवडणूकीत मतदान करतो. पण, अशी व्यवस्था चुकीची आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, काही वेळात व्हिलचेअर येणार असल्याचे मतदान झोनल अधिकारी एस. आर. चव्हाण यांनी सांगितले. परंतु, दुपार झाली तरी व्हिलचेअर काही आली नाही. दरम्यान, यावर कॅमेरासमोर बोलण्यास झोनल अधिकाऱ्यांनी नकार दिला.