मुंबई : मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणी देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळात देखील पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधकांनी मणिपूर प्रकरणावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
मणिपूर मे हैवानित जिंदा : मणिपूर प्रकरणावरुन विरोधकांनी आक्रमक होत विधानभवनाच्या पायऱ्यांवर केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांचे आमदार उपस्थित होते. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भारत वासियो हम शर्मिंदा है, मणिपूर मे हैवानित जिंदा है. अशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
विरोधकांचा सभात्याग : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या मणिपूर घटनेचा निषेध, उलट्या काळजाच्या थंड रक्ताच्या केंद्र सरकारचा धिक्कार, अशा प्रकारचे फलक घेऊन विरोधकांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर विधानसभेमध्ये मणिपूर प्रकरणी केंद्र सरकार विरोधात निषेध ठराव माडण्याची विनंती केली. तसेच मणिपूर घटनेची चर्चा घडवून आणावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी चर्चा करण्यास नाकारल्यामुळे काँग्रेससह विरोधकांनी सभात्याग केला.
सभागृहात मत मांडण्याची अपेक्षा : मणिपूरमध्ये जे घडले ते मानवतेला काळिमा फासणारे आहे. महिला बहिणींवर अत्याचार केले गेले, बलात्कार केले गेले आणि भाऊ आणि वडील मारले गेले. दुर्दैवाने, याकडे लक्ष दिले जात नाही. त्याची उच्च न्यायालयाने दखल घेतली आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान या घटनेबाबत दोन शब्द बोलले. मात्र, यासंदर्भात संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदनही दिले नाही, बोलले देखील नाहीत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोष्टीविषयी सभागृहात मत मांडण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
तीच परंपरा महाराष्ट्रातही : याप्रकरणी विरोधकांना बोलण्याची अनुमती देण्याची आवश्यकता होती. तशी अनुमती न दिल्यामुळे आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी दिली. भारतीय जनता पक्षाला मणिपूर येथील अत्याचारासंदर्भात कोणतीही भावना नाही, तसेच संवेदनाही नाही. असेच चित्र देशाच्या पातळीवर आहे. तीच परंपरा येथे महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाचे लोक चालवत आहेत. हेच निदर्शनात येत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.