मुंबई - महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गाऱ्हाणे सांगणाऱ्या मुलीचा हात धरून तिला धमकावण्याचा केलेला प्रकार हा संतापजनक असून त्यांना सत्तेचा माज चढल्याचे लक्षण आहे. या महापौरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेचा हात पिरगळलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकूर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात नागरी समस्या मोठ्या प्रमाणात असताना त्याकडे महापालिकेला लक्ष द्यायला वेळ नाही. महापौर लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे औदार्यही दाखवू शकत नाहीत. सांताक्रुझमधील पटेल नगरमध्ये विजेचा शॉक लागून आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची तातडीने दखल न घेता महापौर दुसऱ्या दिवशी पटेलनगर मध्ये आले यावेळी संतप्त रहिवाशांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी जाब विचारणाऱ्या एका मुलीला हात पडकून महापौर महाडेश्वर यांनी तिला दम भरला हे अशोभनीय आहे.
"महिलांचा आदर करण्याचे साधे तारतम्यही शिवसेनेच्या या महापौराकडे नाही, समस्या ऐकून घेण्याची सहनशिलता नाही, अशा महापौरावर कारवाई करण्याची गरज आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बेजबाबदार व उद्धट महापौरावर आता काय कारवाई करतात हेही पाहावे लागेल" असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
दरम्यान, "या महिला मनसेच्या होत्या. त्यांनी हाताची साखळी करून आम्हाला अंत्यदर्शन करण्यासाठी रोखले. तेव्हा हात बाजूला करून आम्ही तिथे गेलो. मी हात मुरगळलाच नाही. आम्ही असे कोणतेही चुकीचे काम केले नाही" असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले आहे.