मुंबई - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पुढाकाराने उभारण्यात आलेले दहिसर कांदरपाडामधील कोविड केअर केंद्र आज(सोमवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यानिमित्त दहिसर कांदरपाडामधील कोविड केअर केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. या कोविड केअर सेंटरमधील उपकरणांची पाहणी करून घोसाळकर यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. दरम्यान, कमीतकमी लोकांनी याचा लाभ घ्यावा असे घोसाळकर यांनी सांगितले. हे केंद्र सुरू झाल्याने पश्चिम उपनगरातील रुग्णांना सोयीचे ठरणार आहे.
घोसाळकर यांनी पश्चिम उपनगरांतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी कोविड केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार याठिकाणी दहिसर (पश्चिम) कांदरपाडा येथे हे अद्ययावत केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी 108 आयसीयू खाटांची सुविधा उपलब्ध आहे. याठिकाणी डायलिसिस सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांवर एकाच ठिकाणी सर्व उपचार होणार आहेत. हे केंद्र सुरू झाल्याने स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व नागरिकांनी मुख्यमंत्री व प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. याप्रसंगी शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर उपविभाग प्रमुख विनायक सामंत उपस्थित होते.