मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडाचा फटका भाजप, शिंदे गटाला बसेल अशी भीती व्यक्त करणारे पत्र भाजपच्या गोटातून केंद्राला पाठवले आहे. लोकसभा, राज्यसभा निवडणुका एप्रिल मे 2024 दरम्यान होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकादेखील याच दरम्यान होण्याची शक्यता आहे. लोकसभेला 48 जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरेकडून जागा वाटपाची रणनीती आखली जात आहे.
वंचितला शिवसेनेच्या कोट्यातून जागा : मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या चार, भाजपच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. निवडून आलेल्या चार जागा ठाकरेंना देण्यात येण्याची शक्यता आहे. उर्वरित दोन जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा दिली जाईल. उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील वर्चस्व, अनेक भागातील बालेकिल्ल्यामुळे शिवसेनेला झुकते माफ देण्यात येणार असल्याचे समजते. विधानसभेच्या 288 जागांसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वाधिक जागांवर दावा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीत नव्याने सामील झालेल्या वंचितला शिवसेनेच्या कोट्यातून जागा देण्यात येणार असल्याचे समजते.
राजकारण वंचित भोवती फिरण्याची शक्यता : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीत वंचितला सामावून घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत वंचित पक्षाला सामावून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेमध्ये यावर खलबते होणार आहेत. मुंबई शिवसेना मताधिक्य टिकवून ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची मदत घ्यावी लागणार आहे. आगामी काळातील राजकारण वंचित भोवती फिरण्याची शक्यता आहे.
शिवसेना, भिमसेना एकत्र : मुंबईत स्वबळावर साधारण 81 जागांवर लढण्याचा वंचितने निर्णय घेतला होता. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात भूमिका मांडली होती. शिवसेना, भिमसेना एकत्र आल्याने मुंबईत जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षाचे प्रमुख अधिकृत घोषणा करतील. महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युतीचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.