३ जानेवारी २०२० - सायबर सेफ वूमन अभियानाला सुरुवात
महाराष्ट्र सरकारने 'सायबर सेफ वूमन' अभियान सुरू केले. सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या जंयती दिनी हे अभियान सुरू करण्यात आले. सायबर गुन्ह्यांपासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी याअंतर्गत अनेक योजना राबविण्यात येतात.
२६ जानेवारी २०२० - 'शिवभोजन थाळी'ला सुरूवात
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडी सरकारने २६ जानेवारीला शिवभोजन थाळी सुरू केली. या अंतर्गत गरीबांना फक्त १० रुपयांत जेवण देण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे.
६ जुलै - महाजॉब पोर्टल'चे उद्धाटन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'महाजॉब पोर्टल'चे उद्घाटन केले. स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा म्हणून यावर नोकरी संदर्भातील जाहिराती टाकण्यात येतात. नोकरी शोधणारे आणि उद्योजक यांच्यामधील दुवा म्हणून हे पोर्टल काम करते.
२२ ऑक्टोबर - सीबीआयची तपासाची परवानगी सरकारने काढली
कोणत्याही प्रकरणातील तपासाची सीबीआयची सर्वसामान्य समंती महाराष्ट्र सरकारने काढून घेतली. त्यामुळे आता कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता सीबीआयला आधी सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलीन झाली. तसेच यावरून राजकारणही झाले.
१५ जून - महाराष्ट्रात गुंतवणूक
महाराष्ट्र सरकारने १५ जूनला १२ कंपन्यांशी १६ हजार कोटींचा गुंतवणूक करार केला. यामध्ये परदेशी कंपन्यांचाही समावेश आहे. तेल, रसायने, ऑटो आणि इलेक्ट्रीक क्षेत्रातील कंपन्यांना बरोबर घेवून हा करार करण्यात आला आहे.
६ मार्च - महाविकास आघाडीने मांडला अर्थसंकल्प
महत्त्वाचे मुद्दे -
आमदारांना मिळणारा स्थानिक विकास निधी २ कोटींवरून ३ कोटी करण्यात आला.
जिल्हा विकास नियोजनासाठी ९ हजार ८०० कोटींची तरतूद
राज्य सरकार ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाची निर्मिती करणार. त्यासाठी ५ कोटी मंजूर
सामाजिक न्याय विभागासाठी ९ हजार ६६८ कोटींची तरतूद
उच्च आणि तांत्रिक शिक्षणासाठी तेराशे कोटींची तरतूद
शिक्षण आणि क्रिडा विभागासाठी २ हजार ५२५ कोटींची तरतूद
०२ नोव्हेंबर
महाराष्ट्र सरकारने १५ कंपन्यांशी ३४ हजार ८५० कोटींचा गुंतवणूक करार केला. कोरोनाचा प्रसार असतानाही कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली.
३ डिसेंबर - ग्लोबल टिचर प्राईज सोलापूरच्या रणजितसिंह डिसले यांना
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टिचर प्राईज हा पुरस्कार मिळाला. शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आदीवासी भागातील मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासोबतच शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी यशस्वी प्रयोग राबवले. बारकोडवर आधारित पुस्तक त्यांनी तयार केले.
२०२० वर्षातील पद्म पुरस्काराचे महाराष्ट्रातील मानकरी
रमन गंगाखेडकर - विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी
करण जोहर - कला क्षेत्र
सरिता जोशी - कला
एकता कपूर - कला
जहीर खान - क्रिडा
पोपटराव पवार - सामाजिक क्षेत्र
कंगना रणौत - कला
अदनान सामी - कला
सईद मेहबूब खान कुरेशी - समाज सेवा
डॉ. सँड्रा देसा सुझा - आरोग्य आणि वैद्यक शास्त्र
सुरेश वाडकर - कला
आनंद महिंद्रा - उद्योग आणि व्यवसाय क्षेत्र
१७ मार्च - अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन. वृद्धापकाळाने पुणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
०८ ऑक्टोबर - अविनाश खर्शिकर यांचे निधन
मराठी चित्रपट सृष्टीतील आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शिकर यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अनेक चित्रपटांत आणि नाटकांत त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या आहेत.
२८ नोव्हेंबर - मोदींचा पुणे व्हॅक्सिन दौरा
पंतप्रधान मोदींनी आपल्या व्हॅक्सिन दौऱ्यांतर्गत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीला भेट दिली. सिरमकडून कोरोनावरील लस तयार करण्यात येत आहे. या लसीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला.
२२ ते २४ सप्टेंबर - मुंबईची झाली तुंबई
२२ ते २४ सप्टेंबर या काळात मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेला. ४८ तासांत मुंबईत सुमारे ४०० मिलिमीटर पाऊस झाला. रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. सखल भागातील नागरी वस्तीत पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ झाली.
३ जून - निसर्ग चक्रीवादळात ६ जणांचा मृत्यू
३ जूनला निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकले. या वादळात चार जणांचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वादळाचा प्रभाव राहिला. यात मालमत्तेचे नुकसात झाल्याने महाराष्ट्र सरकारने रायगडसह बाधित जिल्ह्यांना मदत जाहीर केली. वादळ गेल्यानंतर आपत्ती निवारण पथकाने रायगड जिल्ह्यात मदतकार्य सुरू केले. किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
१४ मे २०२० - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेवर निवड
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर आठ जणांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली. विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजेनाईक निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली.
७ नोव्हेंबर - कांजूरमार्ग जागेवरून राज्य सरकारची नोटीस
मेट्रो कारशेडच्या आणि त्यासंबंधीत कामासाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित केल्याची नोटीस महाराष्ट्र सरकारने जारी केले. मात्र, या जागेवर केंद्र सरकारनेही दावा सांगितल्याने ही जागा वादात सापडली असून अद्यापही हा वाद मिटलेला नसून न्यायालयात गेला आहे.
१३ नोव्हेंबर - राज्यपाल आणि मुख्यमंत्री मंदिरे खुली करण्यावरून वाद
कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद होती. तेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. हिंदुत्व सोडून तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहात का? असा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना केला होता. यावरून बरेच राजकीय वादळ उठले. ठाकरे यांनीही राज्यपालांना एक पत्र धाडले. माझ्या हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिले.
८ ऑक्टोबर - टीआरपी घोटाळा आला समोर
टीव्ही वाहिन्यांच्या टेलिव्हीजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) संदर्भातील घोटाळा मुंबई पोलिसांनी समोर आणला. यात देशातील मोठ्या न्यूज चॅनलची नावे सुद्धा उघड झाली आहेत. टीव्ही वाहिन्यांची रेटिंग ठरवताना त्यात फेरफार होत असल्याचे तपासात उघड झाले असून आत्तापर्यंत पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे.
१४ जून - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला मुंबईतील घरी आत्महत्या केली. ही हत्या की आत्महत्या याबाबत मोठी चर्चा रंगली. यावरून राजकारणही झाले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. नंतर सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास गेला. आत्महत्येनंतर अनेक बॉलिवूड अभिनेते, दिगदर्शक आणि संबंधीतांची चौकशी करण्यात आली. शुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतरच बॉलीवूडमधील अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण पुढे आले. या प्रकरणी अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. दिपिका पादूकोन, भारती सिंह, श्रद्धा कपूरसह अनेक अभिनेत्यांची चौकशी करण्यात आली.
सप्टेंबर ३ - कंगना रनौत /महाराष्ट्र सरकार वाद
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्याने वादाला सुरुवात झाली. अनेक शिवसेना नेत्यांनी कंगनावर टीका केली. तेवढ्यावर न थांबता ट्विटरवरून तिने महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल सुरूच ठेवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तिने ऐकेरी उल्लेख केला. दरम्यान, मुंबई महानगरपालिकने अतिक्रण केल्याचे कारण देत 'मणकर्णिका' हे कंगनाचे कार्यालय पाडले. कंगनाला मुंबईत राहण्याच हक्क नाही, असे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. भाजपने ह्या वादापासून स्वत:ला दूर ठेवले.
९ सप्टेंबर - मराठा आंदोलनाला स्थगिती
९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली.
१५ डिसेंबर - महिलांच्या सुरक्षेसाठी 'शक्ती कायदा'
महिलांवरील गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना कठोर शब्दात संदेश जाण्यासाठी कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शक्ती कायद्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे. यामध्ये बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या हे विधेयक विधीमंडळ समितीकडे पाठविण्यात आले आहे.