मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविरोधात एक वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे चांगलेच पडसाद आता उमटत असून राज्यभरातील डॉक्टरांनी या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रने तर यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या डॉक्टरांचा मोठा अपमान राऊत यांनी केला आहे, असे म्हणत ते विधान राऊत यांनी त्वरित मागे घेण्याची मागणी आयएमएने केली आहे.
दोन दिवसापूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी डॉक्टरांसंदर्भात वादग्रस्त विधान केले. डॉक्टरांपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळते. मी तर कम्पाऊंडरकडूनच औषध घेतो असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवरही भाष्य केले होते. डब्ल्यूएचओला काय समजत, त्यांच्या नादाला लागलो म्हणून कोरोना वाढला. सीबीआय प्रमाणे यातही इकडून तिकडून लोकं भरलेत असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर डॉक्टर आणि डॉक्टर संघटना नाराज झाल्या आहेत.
आज आयएमए महाराष्ट्रची एक बैठक पार पडली. यात राऊत यांच्या विरोधात नाराजीचा ठराव मांडला गेला. तर राऊत यांनी त्वरित आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी करणारा ठराव ही मंजूर केल्याचे आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केेेले. कोरोना काळात आम्ही सारे डॉक्टर जीवाची बाजी लावून काम करत आहोत. अशात असे विधान राऊत यांच्या सारख्या व्यक्तीने करणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी हे विधान मागे घ्यावे असेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले.