मुंबई- अहमदाबाद महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दमण बनावटीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान ज्या टेम्पोमधून हा दारूसाठा जप्त करण्यात आला, तो टेम्पोचालक मात्र फरार झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
असा पकडला मद्य वाहतूक करणारा टेम्पो
नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांमध्ये पालघर जिल्ह्यालगतच्या केंद्रशासित प्रदेशातून मद्याची अवैध वाहतूक होत असते. केंद्रशासित प्रदेशातून होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील विविध मार्गांवर गस्त सुरू आहे. शुक्रवारी सकाळी गस्तीवर असलेल्या पथकाला महामार्गावर एक नंबर प्लेट नसलेला टेम्पो मुंबईच्या दिशेने जाताना दिसला. त्या टेम्पोचा संशय आल्याने गस्ती पथकातील अधिकाऱ्यांनी टेम्पोला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने टेम्पो न थांबवल्याने या टेम्पोचा पाठलाग करण्यात आला. पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच, चकवा देत एका ठिकाणी टेम्पो उभा करून चालक फरार झाला.
11 लाख 27 हजार 360 रुपयांचा मद्यसाठा जप्त
दरम्यान उत्पादन शुल्क विभागाकडून या टेम्पोची झडती घेण्यात आली. यामध्ये दारूचे 72 बॉक्स आढळून आहेत. जप्त करण्यात आलेल्या या दारू साठ्याची किंमत 11 लाख 27 हजार 360 रुपये असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे. या करावाईत टेम्पोमध्ये उत्पादन शुल्क विभागाला एक अधार कार्डची प्रत मिळाली असून, हे आधारकार्ड धीरज वसंत पाटील याचे आहे. हा व्यक्ती सराईत मद्य तस्कर असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.